पुणे : कोरोनाच्या अनुषंगाने अधिकाधिक रुग्णांना वैद्यकीय सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने ससून हॉस्पिटल ची नवीन अकरा मजली इमारत सोमवार पासून कार्यान्वित होत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने फ्ल्यू सदृश लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांसाठी या इमारतीमध्ये तळमजल्यावर फ्ल्यू ओपीडी सुरु आहे. तसेच अतिदक्षता विभागात व्हेंन्टीलेटरसह आवश्यक त्या सोयी -सुविधा देण्यात येत आहेत. याशिवाय विलगीकरण कक्ष, अलगीकरण कक्ष, अतिदक्षता विभाग कार्यान्वीत असणार आहे. रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर व परिचारीका यांना पीपीई कीट तसेच पुरेसा औषध साठा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी वेळोवेळी या इमारतीला भेटी देवून सुरु असलेल्या कामांची पहाणी केली होती. तसेच फ्ल्यू ओपीडी, विलगीकरण कक्ष, अतिदक्षता विभाग आदी विभागांच्या कामांची पहाणी करुन उपस्थित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सेवा-सुविधा, आदी बाबींचा त्यांनी पाठपुरावा केला. या पार्श्वभूमीवर आता या इमारतीतून कोरोनाच्या रुग्णांवर वेळेत उपचार होण्यास मदत होईल.