नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊन दरम्यान सुट सवलत मार्गदर्शक तत्त्वांचे देशातील काही भागात पालन होत नसल्याचे सरकारने म्हटले आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार अत्यावश्यक व इतर सामान वाहून नेणारी वाहने पोलिसांनी रोखली आहेत, त्यामुळे वस्तूंचा तुटवडा होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, लॉकडाऊन दरम्यान देशातील काही भागातील लोकांना आणि सेवांना देण्यात येणाऱ्या सवलतींबाबतच्या मार्गदर्शक सूचना व स्पष्टीकरणांचे पूर्ण पालन केले जात नाही. त्यांनी असे नमूद केले आहे की, ट्रक चालवण्यास आवश्यक असणाऱ्या कामगारांना आणि या वस्तूंच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटला लॉकडाऊन दरम्यान पास मिळत नाहीत.
गृहसचिवांनी नमूद केले की, राज्य व राज्यातील सर्व ट्रक व इतर मालवाहू वाहनांना एक वाहनचालक व एका अतिरिक्त व्यक्तीसह फिरण्याची परवानगी आहे. मंत्रालयाने सांगितले की रेल्वे, विमानतळ, बंदरे, कस्टम अधिकारी यांनाही कर्मचारी व कंत्राटी कामगारांना पास देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.