नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोरोना बाधितांची संख्या आता 12 हजार 380 झाली आहे. यातले 1 हजार 489 रुग्ण बरे झाले असून 414 जणांचा मृत्यू कोविड-19 मुळे झाला असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे. काल दिवसभरात 22 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यातले 9 महाराष्ट्रातले होते.राज्यात आतापर्यंत 187 जण दगावले.
आंध्रप्रदेशात 5 , गुजरातमधे 3, दिल्ली आणि तमिऴनाडूमधे प्रत्येकी 2 तर कर्नाटक मधे एकाचा मृत्यू या आजारानं झाला. राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या ३ हजार ८१ वर पोहोचली आहे. काल संध्याकाळी पाच वाजेपासून आतापर्यंत १६५ नव्या रुग्णांची वाढ झाली. या नव्या रुग्णांमध्ये मुंबई महानगरपालिका क्षेत्रातल्या १०७, नागपूर जिल्ह्यात ११, पुण्यात १९ , पिंपरी चिंचवड मध्ये ४, ठाणे जिल्ह्यात १३, वसई-विरार आणि नवी मुंबईत प्रत्येकी २ त्याचप्रमाणे मालेगावात ४, अहमदनगर, चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा नव्या रुग्णांमध्ये समावेश आहे. राज्यात २९५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे, अशी माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे.
आज दुपारपर्यंत पालघरमध्ये १४ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यातले १० पालघर तालुक्यातले आहेत, अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयानं दिली आहे. औरंगाबाद शहरात आज दोन नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळले. त्यामुळे आता औरंगाबाद शहरातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७ झाली आहे.
यवतमाळमध्ये आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला असून एकूण रुग्णसंख्या 10 वर गेली आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण वॉर्डात दाखल असलेल्या 38 जणांना सुट्टी दिली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढचे 14 दिवस त्यांना गृह विलगीकरणात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवलं जाणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 15 रिपोर्ट प्राप्त झाले, यापैकी 14 रिपोर्ट निगेटिव्ह असून एकाचा रिपोर्ट पॉझीटिव्ह आला आहे.
परभणी शहरात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांनी या माहितीला दुजोरा दिला असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
सोलापूर जिल्ह्यात एकूण दहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी नऊ रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आल्यामुळे बाधित झाल्याचं, तर एक रुग्ण कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानं बाधित झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
नाशिक शहरात काल एका २४ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे तर मालेगावमध्ये ४ नवीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून जिल्ह्यात काल संध्याकाळपर्यंत एकूण ४६ कोरोना संसर्गित रुग्ण असल्याचं जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले.