मुंबई : पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मुस्लीम बांधवानी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम करावेत, असे आवाहन राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत करण्यात आले आहे.

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात ३ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्मांचे धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना आदींवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुषंगाने लॉकडाऊनच्या कालावधीत नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तारीसाठी एकत्र न येण्याबाबत केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक कार्य मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यातील सर्व मुस्लीम बांधवांना आवाहन करण्यात आले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात सामाजिक विलगीकरणाच्या सूचनांचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्ये देखील कटाक्षाने करावयाचे आहे. कोणत्याही परिस्थितीत मशीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी एकत्र येऊ नये.  घराच्या, इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इफ्तार करण्यात येऊ नये. मोकळ्या मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण तसेच इफ्तार करण्यात येऊ नये. कोणताही सामाजिक, धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे, याची नोंद घ्यावी. लॉकडाऊनविषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांनाही सूचना

अल्पसंख्याक विकास विभागामार्फत राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांनाही याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. मुस्लिम समाजातील धर्मगुरु, स्थानिक राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांच्यामार्फत मुस्लिम बांधवांना कोरोना प्रतिबंधासाठी दक्षता घेण्याबाबत आणि मशिदीमध्ये नमाज, तरावीह पठण किंवा रोजा इफ्तार कार्यक्रम न करता ते घरीच करण्याबाबत आवाहन करावे, तसेच याबाबत जनजागृती करण्यात यावी, असे कळविण्यात आले आहे.