?????????????????????????????????????????????????????????

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर महानगरपालिका हद्दीमधील रेशनिंग दुकानांच्या धान्य वितरण प्रणालीमध्ये राजकीय हस्तक्षेपाचे प्रमाण वाढत आहे. अधिकाऱ्यांवर दबाव आणला जात आहे त्यामुळे रेशनिंग दुकानदार भयभीत होत आहेत. वाटप प्रणालीमध्ये अडचण निर्माण होत असल्याचे माजी खासदार व ऑल महाराष्ट्र रेशनिंग शाॅपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना केलेल्या निवेदनात बाबर म्हणतात, रेशनिंग दुकानदारांना मारहाण होण्याचे प्रकार जास्त वाढत चालले असून ही चिंतेची बाब आहे. यापूर्वी चेंबूर रेशन दुकानदाराला मारहाण होण्याचा प्रकार घडला.

त्यानंतर मावळ, रायगड, त्र्यंबकेश्र्वर व ठाणे या ठिकाणी सुद्धा दुकानदाराला मारहाण करण्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे रेशन दुकानदारांची सुरक्षा धोक्यात असल्याचे निदर्शनात येत आहे.

रेशनिंग दुकानदारांना धमकावणे, जबरदस्ती करणे व समाजमाध्यमावरून त्यांची बदनामी करणे यामुळे रेशन दुकानदारांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष घालून रेशन दुकानदारांच्या संरक्षणाची व्यवस्था करावी

तसेच रेशन दुकानदारांवर हल्ले होणार नाहीत, याची दक्षता घेतली जावी, अन्यथा 1 मेपासून रेशनिंग दुकानदार शासनाकडून आलेल्या धान्याचा उचलणार नाहीत, असा इशारा माजी खासदार व ऑल महाराष्ट्र रेशनिंग शाॅपकीपर फेडरेशनचे अध्यक्ष गजानन बाबर यांनी दिला आहे.