नवी दिल्ली : तेल आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवरचे अवलंबित्व कमी करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तेल आणि नैसर्गिक वायु मंत्रालय, विविध केंद्रीय मंत्रालयाशी समन्वयाने काम करत आहे. यासाठी पंच-सुत्री धोरण राबवण्यात येत आहे. तेल आणि नैसर्गिक वायुचे देशांतर्गत उत्पादन वाढविणे, ऊर्जा संवर्धन उपाययोजनांना प्रोत्साहन, जैवइंधन आणि पर्यायी इंधनाची उपयोगात न आणलेली क्षमता वापरात आणणे, तेल शुद्धीकरण प्रक्रिया सुधारणा उपाययोजनांची अंमलबजावणी यांचा या पंचसूत्रीत समावेश असल्याची माहिती केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात आज दिली.

केंद्र सरकारने तेल आणि नैसर्गिक वायु शोध आणि उत्पादन वृद्धींगत करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. अद्याप शोध न लागलेल्या तेल आणि नैसर्गिक वायु साठ्यांच्या क्षेत्रात देशांतर्गत आणि विदेशी गुंतवणूक वाढविण्यासाठी फेब्रुवारी 2019 मधे केंद्र सरकारने तेल आणि वायू शोध आणि परवाना धोरणात मोठ्या सुधारणा केल्या.

सीएनजी सारखे पर्यावरण स्नेही वाहतूक इंधनाच्या वापरालाही सरकार प्रोत्साहन देत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.