नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात काल कोविड १९ मुळे ४१ जणांचा मृत्यू झाला तर १ हजार ४०९ नवे रुग्ण आढळले. देशातली कोरोनाबाधितांची संख्या आता २१ हजार ३९३ झाली आहे. आतापर्यंत या आजाराने ६८१ जण मरण पावले आहेत तर ४ हजार २५७ रुग्ण बरे झाले आहेत.
राज्यात गेल्या २४ तासात ४३१ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे राज्यातल्या बाधीतांचा आकडा ५ हजार ६४९ वर पोचला आहे. काल ६७ रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवलं आहे. आतापर्यंत राज्यात ७८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात कोरोना बाधीतांचा आकडा वाढतच आहे. काल आणखी पाच रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं एकट्या मालेगाव तालुक्यातल्या रुग्णांची संख्या १०१ वर पोचली आहे. तसंच नाशिक जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ११५ झाली आहे. शंभरी पार करणारा राज्यातला हा पहिला तालुका आहे.अहमदनगर जिल्ह्यातल्या जामखेड मधल्या दोन रुग्णांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ३३ झाली आहे.
अमरावतीमध्ये मृत्यू झालेल्या दोन महिलांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून, आता जिल्ह्यातल्या कोरोनाबाधित व्यक्तीची संख्या मयत ३ व्यक्तीसह आठवर गेली आहे.
हिंगोलीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात २१ एप्रिल रोजी भरती करण्यात आलेल्या ३० वर्षीय व्यक्तीचा सारी या आजाराने मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा व्यक्ती मुंबईला कामाला होता. त्याच्या जवळच्या व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आहे होते. मात्र या तिघांनाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नसल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी सांगितलं. हिंगोलीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयातल्या विलगीकरण वॉर्डात राज्य राखीव दलाच्या ६ कोरोनाग्रस्त रुग्णांना ठेवण्यात आलं आहे. यांना कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षणं नाहीत आणि त्यांची प्रकृती स्थिर आहे. या ६ जवानांपैकी ५ जवान नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव इथून व एक जवान मुंबईहून आलेला आहे.
अकोला जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत असलेल्या कोरोना संशयित ११ रुग्णांचा दुसरा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यानं प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सापडलेल्या १६ जणांची चाचणी झाली असून तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर या विषाणूमुळे दोघांचा मृत्यू झाला आहे.
कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णाच्या सहवासात आलेल्या ४३ वर्षीय महिलेचा कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
आता सातारा जिल्ह्यात १४ रुग्ण कोरोनाबाधित असून आतापर्यंत ३ रूग्ण मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर २ जणांचा मृत्यू झाला आहे.