पुणे : पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार सहकार आयुक्त श्री.अनिल कवडे, साखर आयुक्त श्री,सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त श्री. सचिंद्र प्रतापसिंग आणि भूजल सर्व्हेक्षण संचालक श्री.कौस्तुभ दिवेगावकर या चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची पुणे शहरासाठी विशेष नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे विभागीय आयुक्त आणि पुणे महापालिका आयुक्तांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे अधिकारी सहाय्य करणार आहेत. आज विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी कोरोना प्रतिबंधक कार्यवाहीच्या दृष्टीने या अधिका-यांशी चर्चा करून पुढील नियोजनाची दिशा ठरविण्यात आली.
पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी आणि व्यापक होऊन शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लवकर नियंत्रणात येण्याच्या दृष्टीने या बैठकीत चर्चा करण्यात आली. पुणे शहरातील कोरोना बाधित रुग्ण अधीक असलेल्या परिसरात आणखी काय उपाययोजना करता येतील, त्यादृष्टीनेही चर्चा झाली. डायबेटीस, ब्लड प्रेशर, हृदयरोग, किडनी विकार किंवा अस्थमा यासह वेगवेगळ्या विकारांमुळे मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक आणि असे विकार असणा-या व्यक्ती कोरोनाबाधित होवून तो रोग त्यांच्यासाठी जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे झोपडपट्टी किंवा दाटीवाटीच्या वस्त्या आहेत, त्या भागात गतीने आरोग्य तपासणीच्या नियोजन तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने केल्या जात असलेल्या साईसुविधा, क्वारंटाईन सुविधा, तपासणी केंद्रे आदी विषयांबाबतही सविस्तर चर्चा झाली.