नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात १६ ग्रामपंचायतींमधल्या २२ गावांनी नक्षलवाद्यांसाठी गावबंदीचे ठराव घेतले आहेत. या ग्रामपंचायती अहेरी तालुक्यातल्या देचलीपेठा परिसरातल्या आहेत. ८ एप्रिलला नक्षलवाद्यांनी जिमलगट्टा-देचलीपेठा मार्गावरच्या किष्टापूर नाल्यावर निमार्णाधीन पुलाच्या कामावरची वाहनं आणि यंत्रसामग्री जाळली होती. तेव्हापासून पुलाचं बांधकाम बंद आहे.
सदर नाल्यावर पूल नसल्यानं या भागातल्या अनेक गावांचा पावसाळ्यात संपर्क तुटतो. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते. नक्षलवाद्यांना यापुढे गावात पाय ठेवू देणार नाही, तसंच कोणत्याही प्रकारची मदत करणार नाही, असं ग्रामस्थांनी ठरावात म्हटले आहे. हे ठराव जिल्हाधिकांऱ्यांकडे पाठवून प्रत्येक ग्रामपंचायतीला ६ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान मंजूर करण्यासाठी पोलिस विभाग प्रयत्न करेल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.