मुंबई : यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. यातील बहुतांश बांधकाम कामगाराचे नोंदणी कार्ड १ जून २०१८ पासून नूतनीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या नोंदणी कार्ड नुतनीकरणाची अट शिथिल करण्यात यावी व यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम मजुरांना दिलासा द्यावा, अशी विनंती राज्याचे वने, भूकंप पुनर्वसन मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी कामगार मंत्री दिलीप वळसे – पाटील यांना पत्राद्वारे केली आहे.
यवतमाळ जिल्ह्यात मध्यंतरीच्या कालावधीत विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका, त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूक तसेच जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता असल्यामुळे बांधकाम मजुरांना ऑनलाईन पद्धतीने कार्ड नूतनीकरण करता आले नाही. सद्यस्थितीत कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे कामगार अधिकारी यांनी कार्ड नूतनीकरण करण्याची कार्यवाही बंद केली आहे. याशिवाय आवश्यक सुविधा नसणे, अपुरा कर्मचारी वर्ग व तांत्रिक कारणामुळे यवतमाळ जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे अद्यापही 80 टक्के कार्ड नूतनीकरण करण्यात आले नसून आता नजीकच्या काळात लगेचच नूतनीकरण होण्याची शक्यता नाही. अनेक बांधकाम कामगारांचे कार्ड नूतनीकरण न झाल्यास त्यांना शासनाच्या पुढील योजनांचा फायदा होणार नाही या गोष्टीकडे वनमंत्र्यांनी कामगार मंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.