१७ हजार व्यक्तींना अटक; ३ कोटी १० लाखांचा दंड
मुंबई : राज्यात सर्वत्र सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या काळात दि.२२ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत राज्यात कलम १८८ नुसार ८७ हजार ३९१ गुन्हे दाखल झाले असून १७ हजार ६३२ व्यक्तींना अटक करण्यात आली.तर या कालावधीत झालेल्या विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी १०लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला अशी माहिती पोलीस विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकामार्फत देण्यात आली आहे.
या कालावधीत राज्यभरात पोलीस विभागाच्या १०० नंबरवर ८१ हजार ६१५ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर Quarantine असा शिक्का आहे, अशा ६२८ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठवले.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२४० वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले.व ५० हजार ८२७ वाहने जप्त करण्यात आली .
परदेशी नागरिकांकडून व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
पोलिसांवर हल्ला प्रकरणे
या कालावधीत पोलिसांवर हल्ला होण्याच्या १६७ घटनांची नोंद झाली असून यात ६२७ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलीस अधिकारी कर्मचारी देखील २४ तास कार्यरत आहेत. या संकटाशी मुकाबला करताना दुर्दैवाने ३० पोलीस अधिकारी व १९७ पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यापैकी ८ पोलीस अधिकारी व २२ कर्मचारी कोरोनामुक्त झाले असून उरलेल्या २२ पोलीस अधिकारी व १७२ पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरू आहेत. दुर्दैवाने ३ पोलीस कर्मचाऱ्यांचे निधन झाले.