मानवतेच्या दृष्टीकोनातून शहरासह राज्यातील कामगारांना कंपन्यांनी वेतन द्यावे..
कामगार नेते इरफान सय्यद यांचे कंपन्यांना आवाहन…
पिंपरी : ‘पृथ्वी ही शेषनागाच्या माथ्यावर नाही तर, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे. शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे हे वाक्य आजही देशातील कामगार, कष्टकरी व पिचलेल्या गोरगरिबांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडते. देशातील व महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कष्टकरी, मजुर, शेतमजुर व कामगार यांचे योगदान देशातील नागरिक नाकारू शकणार नाहीत. आज १ मे महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिन आहे. मात्र, हा दिन साजरा करण्यामागचा खरा उद्देश आजही सफल झालेला नाही. भांडवलदर आणखीनच मोठे होत आहेत तर, गोरगरीब कामगार देशोधडीला लागले आहेत, असे देशातील आणि राज्यातील आजचे चित्र पहावयास मिळते. विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या या कामगारांच्या आस्तित्वासाठी देशभरातील कामगार संघटना आजही व्यवस्थेशी निकराचा लढा देत आहेत. त्यामुळेच आज हा सर्वसामान्य कामगार निदान सुखाचा घास तरी खाताना दिसतो आहे.
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन आहे. राज्य शासनाने व कामगार विभागाने कामगारांना थोडीफार आर्थिक मदत केली. पिंपरी चिंचवड शहरात देखील महाराष्ट्र मजदूर संघटनेने व काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन, कामगारांना अन्न धान्य, तयार जेवन पुरवण्याची जबाबदारी घेतली. परंतु, अजुन किती दिवस हे संकट असणार, हे माहित नाही. केंद्र सरकार व राज्य सरकारने या कामगारांना वेतन देण्याचे आदेश देवूनसुद्धा महाराष्ट्रतील काही कंपन्यांच्या आस्थापनांनी, ठेकेदारांनी, बांधकाम व्यावसायिकांनी अद्याप या कामगारांना वेतन दिलेले नाही. त्यांनी सामाजिक भान जपत, महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून, या गोरगरीब कामगारांना शासनाच्या आदेशानुसार वेतन द्यावे. जेणेकरून त्यांना पुढील जीवन जगणे सुकर होईल, असे आवाहन महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष तथा कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी राज्यातील, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील कंपन्यांच्या मालकांना आणि बांधकाम व्यवसायिकांना, ठेकेदारांना प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार दिन किंवा जागतिक कामगार दिन म्हणून जगभरातील कामगार चळवळींच्या गौरवासाठी पाळण्यात येणारा विशेष दिवस आहे. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांना रोजगार मिळू लागला. परंतु, त्यांची पिळवणूकसुध्दा सुरु झाली. कामगारांच्या या लढ्याची प्रेरणा घेऊनच, अनेक कामगार चळवळी घडल्या व त्याचे फलित म्हणून कामगार संघटनांची निर्मिती झाली. आज देशभरात अनेक कामगार संघटना कामगारांचे प्रतिनिधित्व करत आहे. मात्र, कामगारांची पिळवणूक कमी होताना दिसत नाही. कारण भारतीय कायदे हे कामगारांच्या बाजुने कमी तर, कंपनी मालकांच्या बाजुने जास्त आहेत. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कंपनी व्यवस्थापन व कामगार यांच्या मधील दुवा म्हणून कामगार संघटना भुमीका बजावत आहेत. त्याला काही ठिकाणी यशही येताना दिसून येत आहे. महाराष्ट्र मजदूर संघटनेप्रमाणे जोपर्यंत विकासाची गंगा प्रत्येक कामगाराच्या दारात अवतरीत होत नाही, तोपर्यंत हर एक कामगार संघटनांनी कामगारांच्या लढ्यात अग्रणी रहावयास हवे, असेही सय्यद यांनी म्हटले आहे.
आज देशभरासह पिंपरी चिंचवड शहरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. गेल्या २१ मार्चपासुन लाॅकडाऊनमुळे कंपन्या, उदयोगधंदे, बांधकाम प्रकल्प बंद आहेत. कंपनीत काम करणा-या कामगारांच्या सोबतच कष्टकरी, कामगार, मजुर, बांधकाम कामगार हे काम बंद असल्याने घरीच थांबले आहेत. रोजचे काम बंद असल्याने चुलही बंद झाली आहे. राज्य सरकार व कामगार विभाग तसेच काही स्वयंसेवी संस्था या कामगारांना अन्न-धान्य, जेवन पुरवण्याची जबाबदारी घेत आहे. पण अजुन किती दिवस हे संकट समोर असणार, हे माहित नसल्याने या कामगारांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी प्रत्येक कंपनी मालक, बांधकाम व्यवसायिक, ठेकेदार यांनी मानवतेच्या दृष्टीकोनातून कामगारांची काळजी घेणे गरजेचे आहे. केंद्र व राज्य सरकारचे वेतन देण्याचे आदेश असुनसुद्धा काही कंपनी आस्थापना, ठेकेदार हे कामगारांना वेतन देत नाहीत, असे आमच्या निदर्शनास आले आहे, असेही सय्यद यांनी म्हटले आहे.
आमच्या महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने मी राज्यासह, पिंपरी चिंचवड, पुणे जिल्ह्यातील सर्व कंपनी, उदयोगधंदे, बांधकाम व्यावसायिक तसेच ठेकेदार यांना आवाहन व विनंती करतो; त्यांनी कोरोना संकटकाळी लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या आपल्या आस्थापनांनामध्ये काम करणा-या कामगारांची माहिती घ्यावी, यासाठी कामगार विभाग व स्थानिक प्रशासन हे देखील सहकार्यास तत्पर असतील. आपणांस या बाबतीत काही अडचण जाणवत असल्यास, महाराष्ट्र मजदूर संघटनेशी संपर्क करावा. या कामगारांना सामाजिक भान जपत, महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून शासनाच्या आदेशाचे पालन करून, संकटकाळात विशेष वेतन द्यावे. जेणेकरून त्यांना पुढील जीवन जगणे सुकर होईल, असे आवाहन इरफान सय्यद यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने या पत्रकाद्वारे केले आहे.
तसेच कामगार नेते इरफानभाई सय्यद यांनी महाराष्ट्र राज्य व पिंपरी चिंचवडसह, पुणे जिल्ह्यातील कामगार बांधव व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेछ्या देखील दिल्या आहेत.