पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्राप्त जमावबंदी, संचारबंदी आदेशान्वये कायदेशीर कारवाई करण्यासाठी तसेच जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी 6 मे 2020 रोजी 00.10 वाजल्यापासून ते 20 मे 2020 रोजी 24.00 वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 अनुसार पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान केले आहेत.

या आदेशान्वये रस्त्याने जाणाऱ्या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोकांनी कशाप्रकारे चालावे, त्यांनी वर्तणूक किंवा वागणूक कशी ठेवावी, कोणतीही मिरवणूक कोणत्या मार्गाने, कोणत्या वेळात काढाव्यात किंवा काढू नये असे मार्ग व अशा वेळा विहित करणे, सर्व मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी व उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्यातून किंवा सार्वजनिक जागी किंवा सार्वजनिक स्थळी गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा न होऊ देणे यासाठी योग्य निर्देश देणे, सर्व रस्त्यावर व रस्त्यामध्ये घाट किंवा घाटावर, सर्व धक्यावर व धक्यामध्ये आणि सार्वजनिक स्नानांच्या, कपडे धुण्याच्या व उतरण्याच्या जागांच्या ठिकाणी व जागामध्ये देवालये व इतर सार्वजनिक स्थळी सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ते आदेश देणे, कोणत्याही रस्त्यामध्ये किंवा रस्यावर ढोल-ताशे व इतर वाद्ये व गाणी गाण्याचे, शिंगे व इतर कर्कश वाद्ये न वाजवण्याबाबत योग्य ते आदेश देणे.

कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा कोणत्याही सार्वजनिक करमणुकीच्या कार्यक्रमाच्या वेळी वापरण्यात येणाऱ्या लाऊडस्पिकरची वेळ, पध्दती, ध्वनी तीव्रता, आवाजाची दिशा यांचे नियंत्रण करणे याचा समावेश आहे. सक्षम अधिकाऱ्यांनी या अधिनियमांच्या कलमांन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे याचाही समावेश आहे, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी कळविले आहे.