नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या 216 जिल्ह्यांमधे अद्याप कोविड 19चा एकही रुग्ण आढळलेला नाही. गेल्या 28 दिवसात एकही नवा रुग्ण आढळला नाही असे 42 जिल्हे आहेत, तर गेल्या 21 दिवसात एकही नवा रुग्ण आढळला नाही असे 29 जिल्हे आहेत. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी आज ही माहिती दिली.

योग्य नियमांचं पालन केलं तर कोविड19 चा फैलाव रोखणं शक्य आहे, असं ते म्हणाले. सध्या या आजारातून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 29 पूर्णांक 36 शतांश टक्के आहे. आतापर्यंत 16 हजार 540 रुग्ण बरे झाले असून त्यातले 1 हजार 273 गेल्या 24 तासांत कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 103 जणांचा मृत्यू झाला तर 3 हजार 390 नवे रुग्ण आढळले. देशात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 56 हजार 342 झाली असून मृतांची संख्या 1 हजार 886 झाली आहे.

कोविड 19 वर प्लाझ्मा उपचाराची उपयुक्तता पडताळून पाहण्यासाठी 21 विविध रुग्णालयांमधे भारतीय वैद्यक संशोधन परिषद चाचणी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यात महाराष्ट्रातल्या 5 रुग्णालयांचा समावेश आहे. उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांपैकी 4 पूर्णांक 2 दशांश टक्के रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. फक्त 1 पूर्णांक 1 दशांश टक्के रुग्णांना व्हेंटीलेटर, तर 3 पूर्णांक 2 दशांश टक्के रुग्णांना ऑक्सीजनवर ठेवलं आहे, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली.

सौम्य लक्षणं दाखवणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी रेल्वेचे 5 हजार 231  डबे कोविड केअर सेंटर्समधे रुपांतरित करुन 215 रेल्वे स्थानकांवर ठेवले आहेत, असं त्यांनी सांगितलं. स्थलांतरित मजूर आपापल्या घरी पोचत असताना त्यांची तपासणी आणि इतर कारवाई  योग्य खबरदारी घेऊन करणं त्यांच्या, गावाच्या आणि समाजाच्या हिताचं आहे असं अग्रवाल म्हणाले.