नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंध्रप्रदेशात विशाखापट्टणममध्ये एका प्लास्टिक कंपनीत झालेल्या विषारी वायू गळतीमुळे ११ लोक मरण पावले. तर सुमारे दोनशेहुन अधिक अत्यवस्थ असल्यानं, त्यांना रुग्णालयात दाखल केलं आहे.

वायू गळतीमुळे परिसरातल्या लोकांना श्वसनाचा त्रास, डोळे चुरचुरणे  आणि पोटदुखी जाणवू लागली. पोलिस आणि महसूल विभागानं मदत आणि बचावकार्य सुरू केलं असून आसपासच्या गावांतल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या घटनेतल्या मृतांबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घटनेची पूर्ण माहिती घेत, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांना पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं आहे. त्यांनी राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या बैठकीचं आयोजन केलं होतं.

दरम्यान, स्टायरिन या ज्वालाग्राही द्रवकक्षात हीं गळती झाली असून वायू गळती थांबवण्यात आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकडीला यश मिळालं आहे.