नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे नवं अभियान आणि या अभियानासाठी सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेची घोषणा केली. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा हा काळ भारतासाठी एक मोठी संधी घेऊन आला असून, भारतानं प्रत्येक बाबतीत स्वावलंबी होण्याची गरज असल्याचं त्यांनी आज देशवाशीयांशी संवाद साधताना व्यक्त केली. आत्मनिर्भर भारत अभियानासाठीच्या आर्थिक योजनेचा तपशील केंद्रीय निर्मला सीतारामण लवकरच जाहीर करतील असं त्यांनी सांगितलं.

विकासाला चालना देणारी अर्थव्यवस्था, आधुनिक भारताची ओळख होईल अशा प्रकारची पायाभूत व्यवस्था, २१ व्या शतकातली स्वप्न प्रत्यक्षात आणू शकणारी तंत्रज्ञानाधारी व्यवस्था, आपली लोकसंख्या आणि मागणी हे या आत्मनिर्भरता अभियानाचे मुख्य आधारस्तंभ असणार आहेत असं ते म्हणाले. देशाच्या १३० कोटी नागरिकांनी देशाला आत्मनिर्भर करण्याचादृढ संकल्प करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

ही आर्थिक योजना सुक्ष्म, लघु, मध्यम, कुटीर आणि गृह उद्योगासह देशभरातल्या मजूर आणि शेतकऱ्यांसाठी, प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी, भारताची आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या उद्योग आणि समाजातल्या प्रत्येक घटकासाठी असेल असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान कोरोनापासून बचावासाठी पुन्हा एकादा चौथ्यांदा संचारबंदी लागू करावी अशी सूचना अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यानुसार चौथा लॉकडाऊन सुरु केला जाईल, तो थोडा वेगळा असेल, त्याबाबतची माहितीही १८ मे पूर्वी देऊ असं त्यांनी सांगितलं. कोरोनामुळे

जगभरात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केली. संपूर्ण जग या व्हायरसपासून बचावासाठी एकाप्रकारचं युद्ध लढत आहे. मात्र मानवजातीनं या संकटापुढे हार मानलेली नाही. आपल्याला जीवही वाचावयचाय आणि पुढेही जायचं आहे. असं ते म्हणाले.

२१ व्या शतक भारताचं व्हावं अशी आपल्या सर्वांची इच्छा असेल तर आत्मनिर्भर होणं हाच एकमेव मार्ग असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काल रात्री देशाला संबोधित करताना ते बोलत होते.

कोविड १९ च्या संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी एकूण २० लाख कोटींची प्रोत्साहन योजनेची घोषणा त्यांनी केली. ही रक्कम देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या सुमारे १० टक्के आहे.

केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने आतापर्यंत दिलेल्या सवलतींचा त्यात समावेश आहे. तसंच लॉकडाऊनच्या पुढच्या टप्प्यातल्या दिशानिर्देशांची घोषणा लवकरच होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यापूर्वीच्या लॉकडाऊन मध्ये असलेल्या दिशानिर्देशांपेक्षा ते वेगळे असतील असे संकेतही त्यांनी दिले.

शेतकरी, शेतमजुर, कामगार, कुटीर आणि गृह उद्योग, सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग, कर भरणारे नागरिक अशा सर्वांना या पॅकेजचा लाभ मिळेल असं त्यांनी सांगितलं. कोरोनाचं मोठं संकट जगासमोर असून, भारतासाठी ही स्वावलंबी होण्याची संधी आहे.

त्यामुळं कृषी मालाच्या पुरवठा, नियमित कर भरणाऱ्यांना दिलासा, सोपे कायदे आणि मजबूत वित्तीय यंत्रणा यासारख्या सुधारणांची देशाला गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. यामुळं व्यवसाय वृद्धी होईल, गुंतवणूक वाढेल आणि मेक इन इंडियाला चालना मिळेल.

तळागाळातल्या वर्गाला पुन्हा उभारी देणं आपलं कर्तव्य आहे, त्यामुळे स्थानिक वस्तू खरेदी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.