पुणे, : ‘‘वडगाव शेरी येथील सर्व सेवा संघ या स्वयंसेवी संस्थेने लॉकडाउनमध्ये पहिल्या दिवसापासून अडकून पडलेल्या परराज्यातील सुमारे ६० हजार कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप केली. पुण्यातील वारजे, बावधन, आंबेगाव पठार, डुक्कर खिंड, वेद विहार येथे जागेवर जाऊन ही मदत पोच करण्यात येत आहे. याशिवाय उस्मानाबाद, लातूर, नांदेड, यवतमाळ बीड येथे मजुरांना शोधून काढून ही मदत करण्यात येत आहे’’, अशी माहिती या संस्थेचे मॅथ्यूज यांनी दिली.
मुकुल माधव फाऊंडेशनच्या रितू छाब्रिया, बॅंगलोर येथील विप्रो फाऊंडेशन, पर्सिस्टंट फाऊंडेशन, फोर्ब्स मशिन कंपनी, हेल्थ फॉर इननिड, एससीएनएफ फाऊंडेशन, एसीजी कंपनी, सेव्ह द चिल्ड्रेन आदींनी या मदत कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. वरीष्ठ पोलिस निरीक्षक राजेश पुराणिक, सोशल पोलिसिंगचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश खांडेकर, वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मॅथ्यूज म्हणाले, ‘‘ झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आदी राज्यांतील मजुरांना ही मदत करण्यात येत आहे. या किटमध्ये तेल, आटा, साखर, साबण, तांदूळ, डाळी आदी वस्तूंचा समावेश आहे. देहविक्री करणाऱ्या महिलांची स्थिती बिकट आहे. अशा ३५० महिलांसह हडपसर येथील किन्नर समाजाच्या १०० जणांना महिनाभर पुरेल अशा या अत्यावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. ’’
या बरोबरच सेव्ह द चिल्ड्रेन या संस्थेने सुमारे ३० हजार लोकांपर्यंत मदत पोचविली आहे. जामखेड, इंदापूर आदी ठिकाणच्या ऊसतोड मजुरांच्या मदतीलाही ही संस्था धावून गेली आहे. त्यामुळे हजारो मजुरांचे जगणे सुसह्य होण्यास मदत झाली. या सर्वांच्या मदतीने सर्व सेवा संघ अजूनही तितक्याच सेवाभावाच्या वृत्तीने गरजूंना मदत पोचवित आहे. त्यामुळे मजूरांकडून या संघाच्या कार्याचे कौतुक होत आहे.