मुंबई : आरोग्य विभाग, महिला व बालविकास व आदिवासी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने एकत्रित काम करून आदिवासी विकास योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश आदिवासी विकासमंत्री प्रा. डॉ.अशोक उईके यांनी दिले.
मंत्रालयात आरोग्य विभाग, महिला व बालविकास व आदिवासी विकास विभागाच्या संबंधित कामाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ. उईके बोलत होते.
डॉ. उईके म्हणाले, अंगणवाडी हा ग्रामीण भागातील एक महत्त्वाचा घटक आहे. राज्यात आदिवासी भागात १५ हजार अंगणवाडी आहेत. त्यातील ३हजार अंगणवाड्यांची दुरवस्था झाली आहे त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी. तसेच राज्यात कुपोषित बालकाकडे लक्ष देऊन संपूर्ण राज्य कुपोषणमुक्त करण्यासाठी तिन्ही विभागांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचेही डॉ. उईके यांनी सांगितले.
राज्यात आयुष्यमान भारत व महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरु आहे. या योजनेमार्फत आश्रमशाळेतील मुलांची तपासणी करून सिकलसेल आजाराचे निर्मूलन करण्यासाठी एक संयुक्त कार्यक्रम आखावा, असे निर्देश डॉ.उईके यांनी यावेळी दिले.
या बैठकीला आयुक्त कार्यालय महिला बालविकास, आयुक्त कार्यालय आदिवासी विकास विभाग, संचालक कार्यालय आरोग्य सेवा, राजमाता जिजाऊ मिशनचे वरिष्ठ अधिकारी तसेच एनआरएलएमचे राज्यस्तरीय अधिकारी उपस्थित होते.