नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना संसर्गाच्या काळात अहोरात्र सेवा देणारे डॉक्टर्स आणि वैदयकीय कार्मचारी हे काम करत असलेल्या रुग्णालयांजवळ त्यांच्या राहण्याबाबत काय पावलं उचलली, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला कळवायला सांगितलं आहे.

न्यायमूर्ती एल नागेश्वरराव, संजय कौल आणि बी. आर. गवई यांच्या पीठानं सॉलीसिटर जनरल तुषार मेहता यांना पुढच्या आठवड्यात पीठाला ही माहिती दयायला सांगितलं आहे.

शासकीय रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी आठवडाभर रुग्णसेवा बजावल्यानंतर त्यांचं विलगीकरण केलं पाहिजे, असं मत  जेष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी यांनी सुनावणी दरम्यान मांडलं.

डॉक्टरांची ज्या ठिकाणी रहायची सोय केली आहे त्याठिकाणी  त्यांच्याबरोबर इतर डॉक्टर रहात असल्यानं सुरक्षित अंतर राखण्याच्या मूळ हेतूला हरताळ फासला जात असल्याचं रोहतगी म्हणाले.