नवी दिल्ली : देशभरातली कोविड १९ च्या रुग्णांची संख्या आता एक लाखाच्या वर गेली आहे. गेल्या २४ तासात ४ हजार ९७० नवे रुग्ण आढळले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १ लाख १ हजार १३९ झाली आहे. अर्थात जगातल्या इतर देशांच्या तुलनेत भारतात रुग्णसंख्या १०० वरुन लाखावर पोचायला तब्बल ६४ दिवस लागले. अमेरिकेत अवघ्या २५ दिवसात, स्पेनमधे ३० दिवसात, जर्मनीत ३५, इटली ३६, फ्रान्स ३९, तर इंग्लंडमधे ४२ दिवसात रुग्णसंख्या १०० वरुन एक लाखावर गेली होती.

देशात कोवीडमुळे मरण पावलेल्यांची संख्या १३४ नं वाढून ३ हजार १६३ झाली आहे. तर आतापर्यंत ३९ हजार १७३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालनुसार जगभरात सध्या  ४५ लाख २५ हजार ४९७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. हे प्रमाण एकूण लाखात ६० इतकं आहे. तर भारतात हेच प्रमाण लाखात ७ पूर्णांक १ दशांश इतकं कमी असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

राज्यात काल एकाच दिवसात ७४९ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं. ही आजपर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. यामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण ८ हजार ४३७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. दरम्यान राज्यात काल २ हजार ३३ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या ३५ हजार ५८ वर पोचली आहे.  काल ५१ जणांचा या आजारानं मृत्यू झाला, त्यामुळे राज्यात या आजारानं मरण पावलेल्यांची संख्या १ हजार २४९ झाली आहे. सध्या राज्यात २५ हजार ३९२ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.