नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात जिल्हाजिल्ह्यात अडकलेल्या लोकांनी घरी जायची घाई करू नये. गावाला जाऊन कुटुंब आणि गावाला अडचणीत आणू नका असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते काल रात्री राज्यातल्या जनतेला संबोधित करत होते.

राज्यात रेडझोन वगळता ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये काही उद्योग व्यवसायांना मान्यता देण्यात आली आहे. आजघडीला ७० हजार उद्योगांना परवानगी देण्यात आली असून ५० हजार उद्योग सुरु ही झाले आहेत. ५ लाख कामगार काम करत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात ४० हजार एकर जमीन उद्योगासाठी राखून ठेवण्यात आली आहे. त्याचा लाभ घेऊन परदेशी उद्योजकांनी पुढे यावे, हरित उद्योग सुरु करावेत, त्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, कोणत्याही अटी आणि शर्थीशिवाय राज्यात उद्योग सुरु करता येईल. ग्रीन झोन मध्ये उद्योग सुरु करतांना जमीन घेण्यासाठी पैसे नसतील तर भाडेतत्वावर जमीन उपलब्ध करून देतांना सर्वप्रकारच्या पायाभूत सुविधांची ही उपलब्धता करून दिली जाईल. अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. स्थानिक भुमीपुत्रांनी पुढे यावे आणि उद्योग संधींचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

जितक्या स्वंयशिस्तीने वागाल तितके लॉकडाऊन लवकर संपेल, असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी या आजाराचे गांभीर्य लक्षात घेण्याची गरज व्यक्त केली. लॉकडाऊन किती काळ राहणार, याचे उत्तर कोणाकडेच नाही, जगाकडे ही नाही असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, लॉकडाऊनमुळे विषाणुची साखळी तोडण्यात यश आले नसले तरी त्याची गती कमी करण्यात आपण नक्कीच यशस्वी झालो आहोत.

राज्यात १ हजार ४८४ कोव्हीड केअर सेंटर्स, २ लाख ४८ हजार ६०० खाटांची उपलब्धता असल्याचेही ते म्हणाले. वैद्यकीय अधिकारी, पोलीसांना आराम देण्याची गरज आहे. हे लक्षात घेऊन  आणखी कोविड योद्ध्यांनी पुढे येऊन रुग्ण सेवा करावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले.