डॉ. दीपक म्हैसेकर, सौरभ राव व सचिंद्र प्रताप सिंग यांची संसर्ग चाचणी केंद्रास भेट
पुणे : कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट नजीक नागरिकांच्या तपासणीसाठी उभारण्यात आलेल्या संसर्ग चाचणी केंद्रास विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, साखर आयुक्त सौरभ राव व पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग यांनी भेट देऊन पाहणी केली. याठिकाणी पीपीई किट घालून तपासणी करणारे व वैद्यकीय सुविधा पुरविणारे डॉक्टर व वैद्यकीय अधिका-यांशी डॉ.म्हैसेकर यांनी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले.
यावेळी त्यांच्यासोबत अपर पोलीस आयुक्त सुजित फुलारी, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल, उपायुक्त नितीन उदास, सहाय्यक आयुक्त विजय दहिभाते, किशोरी शिंदे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मुळे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजिरी कोलते आदी उपस्थित होते.
शिवाजीनगर येथील पाटील इस्टेट, इराणी वस्ती, पाटकर प्लॉट, महात्मा गांधी वसाहत येथील नागरिकांच्या तपासणीसाठी संसर्ग चाचणी केंद्र उभारण्यात आले आहे. याठिकाणी आजवर तपासणी करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या, त्यापैकी बाधित रुग्णसंख्या येथिल प्रतिबंधित क्षेत्रातील रुग्णदर व मृत्यूदर, चाचणी केंद्रामधून करण्यात येणारा औषधोपचार आदी बाबींची डॉ. म्हैसेकर व वरिष्ठ अधिका-यांनी माहिती घेतली. यावेळी पीपीई किट घालून तपासणी करणा-या डॉक्टर व वैद्यकीय अधिका-यांच्या कामाचे कौतूक करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे आश्वासनही डॉ.म्हैसेकर यांनी यावेळी दिले. तसेच पुरेसे मास्क, सॅनिटायझर, पीपीई किट उपलब्ध असल्याबाबत माहिती खात्री केली.
या चाचणी केंद्रातून तपासणी करुन घेतलेल्या नागरिकांची व बाधित रुग्णांची वैद्यकीय पार्श्वभूमी व अन्य माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मुळे व सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. मंजिरी कोलते यांनी दिली.