पुणे : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व साखर आयुक्त सौरभ राव यांनी आज भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत स्वॅब तपासणी सेंटर व कंटेन्मेंट क्षेत्रांची पाहणी केली. तसेच महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती घेतली.
डॉ. म्हैसेकर व श्री. राव यांनी आज भवानी पेठेतील महापालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळेतील स्वॅब सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी येथील स्वॅब तपासणी सेंटर मधील नागरिकांची नोंदणी, स्वॅब घेण्यात येणारा कक्ष, विलगीकरण कक्ष, प्रत्येक ठिकाणी नागरिकांसाठी करण्यात आलेली सुविधा, भोजन सुविधा याबाबतची सविस्तर माहिती घेतली.
स्वॅब सेंटर पाहणीनंतर भवानी पेठ व रामोशी गेट परिसरात प्रतिबंधित करण्यात आलेल्या बंदिस्त भागाची त्यांनी पहाणी केली. येथील परिस्थितीबाबत नगरसेवक अविनाश बागवे, प्रदीप गायकवाड व येथील पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. येथील छोटी घरे व त्यात 5 ते 6 नागरिक राहतात, त्यामुळे सोशल डिस्टनसिंग ची प्रभावी अंमलबजावणी होत नाही, हे सांगून पुर्वीच्या तुलनेत सध्या भवानी पेठ भागातील रुग्णदर कमी होत असल्याची माहिती महापालिका व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. येथील सुविधांबाबत तसेच रुग्णदर कमी होत असल्याबद्दल डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी समाधान व्यक्त केले.
प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार असणाऱ्या नागरिकांची माहिती अद्ययावत करुन त्यांच्या तपासणीवर भर देऊन अधिक काळजी घ्यावी, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले. तसेच
या परिसरात आजपर्यंत आढळलेले संशयित रुग्ण, बाधित रुग्ण, स्वॅब टेस्टिंग, नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सर्वेक्षण, जनजागृती अशा विविध स्वरूपाच्या करण्यात आलेल्या कामकाजविषयी त्यांनी माहिती घेतली.
यावेळी नगरसेवक अविनाश बागवे, प्रदीप गायकवाड, सहपोलिस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, महापालिकेचे उपायुक्त माधव देशपांडे, सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर, वैद्यकीय अधिकारी राजेश दिघे, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी अस्लम सुतार, उप अभियंता बाळासाहेब तुले, भास्कर महाडिक व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.