नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडीची सत्ता काळाची ५ वर्ष लॉकडाऊनमधे गेली असे कोणतेही चित्र राज्य सरकारला बिलकूल उभे करायचे नाही, त्याउलट हा लॉकडाऊन लवकरात लवकर संपावा यासाठीच प्रयत्न सुरु आहेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते आज समाजमाध्यमांवरून राज्यातल्या जनतेशी संवाद साधत होते.

कोरोनाच्या गुणाकाराला मर्यादा नसल्याने, राज्यातली कोरोनाबाधितांची संख्या वाढणार असल्याचा अंदाजही त्यांनी यावेळी वर्तवला. येत्या मे अखेरीसच कोरोनाविषयक देशातली स्थिती अधिक ठळकपणे समोर येईल. मात्र त्यासाठी राज्यानं पूर्ण तयारी केली आहे, मे अखेरीपर्यंत राज्यात कोरोनाबाधितांसाठी आणखी १३ ते १४ हजार खाटा उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी दिली. उपचारांदरम्यान रक्ताची गरज भासणार असून, त्यासाठी जमेल त्यांनी आरोग्यविषयक सुरक्षिततेचे नियम पाळून रक्तदानासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले.

कोरोनावर औषध नसले तरी कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णावर वेळेत उपचार करणे, आणि त्याला कोरोनामुक्त करणे शक्य होते, त्यामुळे कोरोनाविषयीचे लक्षण दिसत आहेत का यावर काटेकोर लक्ष ठेवावे, आणि अशी लक्षणे दिसू लागली न घाबरता लगेचच समोर यावे असे आवाहनही त्यांनी केले. पावसाळ्यात साथीचे आजार वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन, या काळात लागलेल्या आरोग्यविषयक सवयी कायम ठेवाव्यात असा सल्लाही त्यांनी दिला.

राज्यात इतर राज्यांमधून आलेले मजूर आणि नागरिकांना परत पाठवण्यासाठी, तसेच ते इथे असेपर्यंत त्यांच्यासाठी केलेल्या सोयी सुविधांची माहिती त्यांनी दिली. परराज्यातल्या नागरिकांना पाठवण्यासाठी दररोज ८० गाड्यांची मागणी राज्य सरकारनं केली आहे, मात्र सध्या केवळ ४० गाड्याच सोडल्या जात आहेत, आत्तापर्यंत सोडलेल्या सर्व गाड्यांसाठी राज्य सरकारनं ८५ कोटी रुपये खर्च केले आहेत, मात्र केंद्राकडचा निधी अद्याप मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात होळीपासूनचे सर्व सण साध्या पद्धतीनंच साजरे झाले आहेत. मुस्लीम बांधवांनीही आपलं सहकार्य कायम ठेवत रमझानमधला ईदचा साधेपणाने साजरा करावा असे आवाहन त्यांनी केले.

लॉकडाऊनच्या काळातच शक्य तिथे उद्योग आणि जिल्ह्यांतर्गत प्रवासात काही शिथीलता दिली आहे. येत्या काळातही टप्प्या टप्प्याने अनेक सेवा सुरु केल्या जातील. मात्र कुठेही गर्दी होतेय असे आढळून आले तर मात्र त्यावर पुन्हा बंदी आणावी लागेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

कोरनाच्या संकटकाळात प्रत्येक घटकाची सोय करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणे ही राज्यसरकारची प्राथमिकता आहे, त्यामुळे या संकटकाळाचे कोणीही राजकारण करू नये असे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.