नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या देशातल्या ११ महानगरपालिकांनी पुढील २ महिने कोविड-१९ चा बंदोबस्त करता येईल, या दृष्टीनं आरोग्य क्षेत्राच्या  पायाभूत सुविधा मजबूत कराव्यात, असे आदेश केंद्रसरकारने दिले आहेत. देशातल्या एकूण  कोरोना बाधितांपैकी ७० टक्के कोरोना बाधित  या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये असून, महाराष्ट्र, तामिळनाडू, गुजरात,नवी  दिल्ली, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये ही क्षेत्रे आहेत.

केंद्रीय आरोग्य सचिव प्रीती सुदान यांनी काल या महापालिकांचे मुख्य आरोग्य सचिव आणि पालिका आयुक्तांबरोबर व्हिडीओ कॉन्फेरंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला.  कोविड १९ चा प्रसार रोखण्यासाठी  या महानगरपालिकांनी आपल्या क्षेत्रातला  शहराचा जुना भाग, झोपडपट्टया आणि स्थलांतरित कामगारांची वस्ती असलेल्या भागावर लक्ष ठेवावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले.

या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये कोरोना संसर्गाच्या दुपटीचा वेग तसेच मृत्यू दर देशाच्या अन्य भागापेक्षा जास्त आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रमाणात कोविड १९ चाचणी, तसेच कोरोना बाधितांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींचा तपास या गोष्टींकडे लक्ष द्यावे असे त्यांनी सांगितले.