नवी दिल्ली : महाराष्ट्रातून देशात विविध ठिकाणी पोहोचवायच्या स्थलांतरितांची यादी, राज्य सरकारनं रेल्वे विभागाकडे दिली आहे, रेल्वे विभागानं फक्त, आधी जाहीर केलेल्या ठिकाणीच गाडी न्यावी असा टोला, शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना लगावला आहे.

वसईहून 21 मे रोजी रवाना झालेली, वसई-गोरखपूर श्रमिक विशेष रेल्वेगाडी, उत्तर प्रदेशात गोरखपूरला जायच्या ऐवजी ओदिशात पोहोचली, त्यामुळे गोरखपूरला पंचवीस तासात पोहोचण्याऐवजी प्रवाशांना दोन ते अडीच दिवस लागले. या पार्श्वभूमीवर राऊत यांनी हे ट्विट केलं आहे. प्रवाशांची, सर्व माहितीसह यादी द्या, रेल्वे महाराष्ट्रातून 125 गाड्या सोडायला तयार आहे, असं पियुष गोयल यांनी राज्य सरकारला कळवलं होतं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मात्र रेल्वे विभागाचं कौतुक केलं आहे. प्रचंड ताण असूनही पियूष गोयल आणि रेल्वे विभाग करत असलेल्या कामाचा आदर राखायला हवा असं त्यांनी म्हटलं आहे पियुष गोयल या प्रकरणाचं राजकारण करताहेत का यावर विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.