पिंपरी : पिंपरीत एका खासगी कार्यक्रमासाठी अजित पवार शहरात आले होते. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, पिंपरी महापालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असताना नियोजन करुन विकासकामे केली जात होती. ‘व्हिजन’ डोळ्यासमोर ठेऊन काम करायचो. परंतु, आता तसे होत नाही. सत्ताधाऱ्यांकडे ‘व्हिजन’ नाही. शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.

पवार म्हणाले, शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. विरोधी पक्षनेते असताना दत्ता साने यांच्या जनसंपर्क कार्यालयावर पण भ्याड हल्ला झाला. सातत्याने शहरात गंभीर घटना घडत आहेत. वाहनांची तोडफोड केली जाते. काहीजणांकडून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. शहरात स्वतंत्र पोलीस आयुक्तालय झाले आहे. त्यामुळे गुन्हेगारी आटोक्यात आली पाहिजे.

आम्ही अनेक वर्ष राज्याचे, पिंपरी-चिंचवड शहराचे आम्ही प्रतिनिधीत्व केले आहे. शहरात जातीय सलोखा राखला पाहिजे. सर्वांनी एकाप्याने रहावे. शहरात शांतता नांदावी. याबाबत पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांच्याशी बोललो आहे. आमचे पोलिसांना सहकार्य आहे. आम्ही विरोधाला विरोध करणार नाही. परंतु, वेगळा विचार करुन सत्तेचा गैरवापर करुन विरोधकांना अडचणीत आणण्याचे, संपवण्याचे, नाऊमेद करण्याचे काम केले. तर, ते मात्र खपवून घेणार नाही. ही बाब त्यांना स्पष्टपणे सांगितली असल्याचे पवार म्हणाले.