नवी दिल्ली : येत्या दोन आठवड्यांत मुंबईत कोविड -१९ चा उपचार करणारी, ७ हजार बेडची संयुक्त क्षमता असलेली रुग्णालयं आणि केंद्रं सुरू होणार आहे.  ही रुग्णालयं आणि केंद्रं महालक्ष्मी रेसकोर्स, गोरेगाव, दहिसर आणि मुलुंड या उपनगरांमध्ये सुरू होतील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयातून सांगण्यात आलं.

३१ मे पर्यंत मुंबई शहरात रुग्णखाटांची संख्या २ हजार ४७५ नं वाढेल, असं मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलं. मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डातल्या खाजगी रुग्णालयांमधून १०० खाटा आणि २० अतिदक्षता रुग्णखाटा ताब्यात घ्यायला राज्य सरकारनं सुरुवात केली आहे.

रुग्णवाहिन्यांची संख्या  १०० वरुन ४५० पर्यंत वाढवली आहे, असंही मुख्यमंत्री कार्यालयानं सांगितलं. दरम्यान, कोरोना चाचणीचा अहवाल पॉजिटीव्ह आल्यामुळे कॅबिनेट मंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांना काल मुंबईतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर कोरोनाची लागण झालेले ते दुसरे कॅबिनेट मंत्री आहेत.