नवी दिल्ली : देशात कोविड १९ ते रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ४१ पूर्णांक ६१ शतांश टक्के एवढं झालं आहे. गेल्या २४ तासात देशात २ हजार ७६९ रुग्ण बरे झाले, आतापर्यंत ६० हजार ४९० रुग्ण बरे होऊन घरी परतल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूची लागण झालेले ६ हजार ५३५ नवीन रुग्ण आढळले. देशातली रुग्णसंख्या १ लाख ४५ हजार ३६० झाली आहे. गेल्या २४ तासात या आजारामुळे १४६ रुग्णांचा मृत्यू झाला असून, आतपर्यंत एकूण मृतांची संख्या ४ हजार १६७ झाली आहे.
राज्यात काल १ हजार १८६ कोरोनाबाधित रुग्ण कोरनामुक्त होऊन घरी परतले. त्यामुळे राज्यातल्या कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १५ हजार ७८६ वर पोचली आहे. राज्यात काल २ हजार ४३६ नवे कोरोनाबाधित आढळले तर ६० जणांचा मृत्यू झाला.
त्यामुळे राज्यातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५२ हजार ६६७, तर कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या १ हजार ६९५ झाली आहे. सध्या राज्यतभरात ३५ हजार १७८ कोरनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान राज्यात कालपर्यंत ३ लाख ७८ हजार ५५५ कोरोना चाचण्या झाल्या आहेत.
राज्यभरातल्या १६ हजार १०६ कोरनाविषयक आरोग्य पथकांनी ६६ लाखांहून अधिक लोकसंख्येचं कोरोनाविषयक सर्वेक्षणही केलं आहे. राज्यात सध्या ३५ हजार ४७९ लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत अशी माहिती , अशी माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
मुंबईत काल ३८ रुग्णांचा मृत्यू झाला, तर १ हजार ४३० नवे रुग्ण आढळले. आतापर्यंत ३१ हजार ७८९ जणांना कोरोना संसर्ग झाला आहे. त्यापैकी ८ हजार ४०४ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
जालना जिल्ह्यात आज आणखी २ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ७६ झाली आहे. बाधितांमध्ये जाफराबाद तालुक्यात हिवराकाबली आणि जालना तालुक्यात वखारी वडगाव इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज कोरोना विषाणूची बाधा झालेले नवे २२ रुग्ण आढळले. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोना विषाणूबाधित रुग्णांची एकूण संख्या एक हजार ३२७ झाली आहे.
अमरावती जिल्ह्यात आज आणखी ४ रुग्णांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचं दिसून आलं. यात ३ महिला आणि १ पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणूची बाधितांची एकूण संख्या १८२ झाली आहे.
वर्धा जिल्ह्यात विलगीकरणात असलेल्यांपैकी ३ जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यात मुंबईच्या शीव इथल्या खाजगी रुग्णालयातली परिचारिका तसंच मुंबईतल्याच चेंबूर परिसरातल्या एका दाम्पत्याचा समावेश आहे. या तीन रुग्णांमुळे वर्धा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६ झाली आहे.
पालघर जिल्ह्यात काल ६४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यात दोन पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातली कोरोनाबाधितांची संख्या ६२५ झाली आहे. यापैकी सर्वाधिक ५५३ रुग्ण वसई विरार महानगर पालिका क्षेत्रातले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे आत्तापर्यंत २२ जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात काल ६५ नव्या कोरोनाबाधित रूग्णांची वाढ झाली. त्यामुळे तिथली रुग्णसंख्या १ हजार ७११ झाली आहे. यापैकी सध्या ८८० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
रायगड जिल्ह्यात काल ५५ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले, तर ४४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात काल २ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातली एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८०१ वर पोचली आहे, मात्र यापैकी ४६३ रुग्ण कोरनामुक्त होऊन घरी परतले असल्यानं सध्या ३०३ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
रत्नागिरीत काल ५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे जिल्ह्यातली कोरोनाबाधितांची संख्या १६१ वर पोचली आहे. त्यापैकी ५५ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर सध्या १०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात स्वॅब चाचणीची प्रयोगशाळा सुरू करण्यासाठीच्या मान्यतेचा शासन निर्णय काल जारी झाला आहे.
सातारा जिल्ह्यात काल २७ नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर आमोद गडीकर यांनी दिली.
सोलापुर जिल्ह्यात काल २५ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर ७ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या २७३ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. तर आत्तापर्यंत २७७ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
बीड जिल्ह्यात काल आणखी ६ नवे कोरोनाबिधत रुग्ण आढळल्यानं आता तिथली कोरोनाबाधितांची संख्या ४७ वर पोचली आहे. तिथं सध्या ३९ जणांवर उपचार सुरु आहेत.