नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लॉकडाऊनमुळे कोविड १९ च्या प्रसाराचा वेग कमी झाला, तसंच संभाव्य मृत्यूंची संख्याही प्रत्यक्षात कमी राहिली, असं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. शिवाय लॉकडाऊनच्या काळात कोविड १९ शी संबंधित आरोग्य सुविधांचा विकास, चाचणी क्षमतेत वाढ, लस संशोधन इत्यादी कामं सुरु झाली.
तांत्रिक आघाडीवर दक्षता प्रणाली मजबूत करता आली, आरोग्य सेतूसारख्या साधनांद्वारे अधिकाधिक संपर्कशोध, घरोघर सर्वेक्षण इत्यादी कामं करता आली. लॉकडाऊन काळात ९०० पेक्षा जास्त कोविड १९ समर्पित रुग्णालयं उपलब्ध करता आली. त्यामुळे १ लाख ५८ हजार अलगीकरण खाटा, २० हजारापेक्षा जास्त अति दक्षता रुग्णखाटा, आणि प्रणवायू पुरवठ्याची सोय असलेल्या सुमारे ७० हजार रुग्णखाटा उपलब्ध झाल्या असं मंत्रालयानं सांगितलं.
राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना १ कोटी १३ लाख एन ९५ मास्क आणि ९० लाख पीपीई केंद्र सरकारनं दिले असल्याचंही मंत्रालयानं सांगितलं. देशात कोविडमुळे दगावणाऱ्या रुग्णांचं प्रमाण सध्या २ पूर्णांक ८६ शतांश टक्के आहे. जगभरात हेच प्रमाण सरासरी ६ पूर्णांक ३६ शतांश टक्के आहे, असं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.