नवी दिल्ली : देशभरात कोरोना बाधितांची संख्या एक लाख ९० हजार ५३५ वर पोहोचली असून त्यापैकी ९१ हजार ८१९ जण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण आता ४८ पूर्णांक १९ शतांश टक्के झालं आहे. सध्या देशात ९३ हजार ३२२ रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत पाच हजार ३९४ जणांचा मृत्यू झाला आहे. कोविड १९ च्या महामारीचा सर्वात जास्त फटका बसलेल्या देशांमधे आता भारत ७ व्या स्थानावर आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीत म्हटलंय की आज सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासात कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले ८ हजार ३९२ रुग्ण आढळले तर २३० रुग्णांचा मृत्यू झाला.
राज्यात काल दिवसभरात दोन हजार ४८७ नवीन कोरोना विषाणू बाधित रूग्ण आढळले. तर ८९ रुग्णांचा मृत्यू झाला. काल दिवसभरात एकूण एक हजार २४८ रूग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यातली एकूण रुग्णसंख्या ६७ हजार ६५५ एवढी झाली असून आतापर्यंत या आजारानं दोन हजार २८६ जण मरण पावले.
मुंबईत काल १ हजार २४४ नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे मुंबईतली एकूण रुग्णसंख्या ३८ हजार ४६४ झाली आहे. काल दिवसभरात ५२ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत मुंबईतल्या मृतांची एकूण संख्या १ हजार २७९ एवढी झाली आहे. काल ४३० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.