नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला हा इशारा देण्यात आला आहे. येत्या १२ तासात हे वादळ सक्रीय होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या नैऋत्येला सुमारे ४९० किलोमीटर अंतरावर हा कमी दाबाचा पट्टा असून सध्या त्याचा वेग ताशी ११ किलोमीटर आहे. उद्या दुपारी राज्याच्या किनारपट्टीवर हे वादळ येऊन धडकण्याची शक्यता आहे.

राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक अर्थात एनडीआरएफच्या एकूण ३३ तुकड्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफचे महासंचालक एस एन प्रधान यांनी ही माहिती दिली. यापैकी १० तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत. तर इतर सहा तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत. राज्याचं आपत्ती निवारण पथकही सज्ज आहे. मंत्रालयात २४ तास कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला.

कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांना पक्क्या घरात स्थलांतरित करण्यात येत आहे. मुंबई कमी उंचीवर असलेल्या भागातील आणि झोपडीत राहणाऱ्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविले जात आहे. चक्रीवादळामुळे अधिक नुकसान होऊ नये यासाठी सर्व खबरदारी घेतली जाते आहे. वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून सर्व प्रयत्न केले जात आहेत. पालघर आणि रायगड जिल्ह्यात असलेल्या रासायनिक आणि अणूऊर्जा प्रकल्पांच्या सुरक्षेचीही पुरेशी काळजी घेण्यात आलेली आहे.

सर्व मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. पालघर जिल्ह्यातल्या १३ बोटी अजून परत आलेल्या नाहीत. समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना परत आणण्याची जबाबदारी तटरक्षक दलावर सोपविण्यात आली आहे. जीवितहानी होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

या चक्रीवादळामुळे वसई, पालघर, डहाणू तालुक्यातले सर्व उद्योग, कार्यालय, दुकाने, खासगी कार्यालय बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. सर्व कारखान्यांनी रसायन आणि वायू उत्सर्जन होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

रायगड जिल्ह्यात अलिबाग, पेण, मुरुड, तळा, म्हसळा, श्रीवर्धन आणि रोहा या तालुक्यात उद्या मध्यरात्रीपर्यंत नागरिकांना घराबाहेर पडायला बंदी घालण्यात आली आहे.