मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक अर्थात एनडीआरएफच्या एकूण ३३ तुकड्या महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये तैनात करण्यात आल्या आहेत. एनडीआरएफचे महासंचालक एस एन प्रधान यांनी ही माहिती दिली. यापैकी १० तुकड्या राज्यात तैनात करण्यात आल्या आहेत. पालघर, डहाणू, सिंधुदुर्ग, रत्नागिरीत या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. तर इतर सहा तुकड्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

याशिवाय वसईमध्ये राज्य आपत्ती निवारण पथक अर्थात एसडीआरएफच्या २ तुकड्या तैनात आहेत.  एसडीआरएफच्या दोन तुकड्या रायगडमध्ये दाखल झाल्या असून एक तुकडी हरिहरेश्वीर तर दुसरी अलिबागला तैनात आहे. राज्याचं आपत्ती निवारण पथकही सज्ज आहे. मंत्रालयात २४ तास कार्यरत राहणारा नियंत्रण कक्ष उभारण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेनंही चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी सर्व तयारी केली आहे. नागरिकांना चक्रीवादळासंबंधित कुठलेही प्रश्न असल्यास १९१६ वर फोन करण्याचे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे.

नौदलही मुंबईत सक्रिय आहे. मुंबईत विविध ठिकणी नौदलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. संपूर्ण मान्सून काळात पुराच्या काळात मदत करणाऱ्या ५ आणि खोल पाण्यात जाऊन शोध घेणाऱ्यांची ३ पथकं तैनात राहणार आहे.  नौदलाच्या सर्व तुकड्यांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.