पिंपरी : सर्व सामान्य नागरिकांचा ज्याठिकाणी सतत संपर्क येतो आणि नागरिकांच्या विश्वास असलेले कार्यालय म्हणजे पोस्ट कार्यालय. सर्वसाधारणपणे शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी नागरिकांशी सौजन्याने वागावे असा संकेत आहे, शिवाय शासनाचा आदेशही आहे. अशी माहिती जागृत नागरिक महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष नितीन श. यादव यांनी साप्ताहिक एकच ध्येयला दिली.

तथापि, पिंपरी चिंचवड शहरातील रुपीनगर पोस्ट कार्यालयातील पोस्ट मास्तर आणि कर्मचारी यांचे नागरिकांची वागणे उर्मटपणाचे आणि उद्धटपणाचे असल्याबाबत अनेक तक्रारी जागृत नागरिक महासंघाकडे आल्या होत्या. जागृत नागरिक महासंघ संलग्न, अखिल महाराष्ट्र माहिती अधिकार समितीतर्फे नुकतेच, माहिती अधिकार कायदा 2005 कलम 4 अंतर्गत रुपीनगर पोस्ट कार्यालयाची पाहणी करण्यात आली.

या पाहणीमध्ये नागरिकांच्या माहितीसाठी कोणतेही फलक याठिकाणी लावलेले नसल्याचे आढळून आले. सदर फलक लावणे कायद्याने बंधनकारक असतानाही, संबंधित पोस्ट कार्यालयाने असे फलक लावण्यास असमर्थता दाखवली. त्यांनी “हे कार्यालय वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशाने चालते” असे सांगितले. त्यामुळे समितीने मा. एम. एस. बडवे केंद्रीय जनमाहिती अधिकारी तथा प्रवर अधीक्षक डाकघर पुणे शहर पूर्व विभाग पुणे, यांच्याकडे नागरिकांच्या माहितीसाठी कायद्याने बंधनकारक असे सर्व फलक तत्काळ लावण्यासाठी रुपीनगर पोस्ट कार्यालयाला आदेश देण्याची विनंती केली.

मा. बडवे यांनी समितीच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत आणि माहिती अधिकार कायद्यामुळे रुपीनगर पोस्टमास्तर यांना सर्व महितीचे फलक तात्काळ लावण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.