आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर उपचारासाठी राज्य शासनाने ‘रेमडेसीवीर’ इंजेक्शनच्या १० हजार व्हॉयल्स घेण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.
या संदर्भात माहिती देतांना आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ‘रेमडेसीवीर’ हे इंजेक्शन ॲण्टी व्हायरल आहे. ‘सार्स’ आजारासाठी वापरण्यात आलेले हे इंजेक्शन त्यावर उपयुक्त ठरल्याने कोरोनावरही ते उपयुक्त ठरू शकते असे जागतिक आरोग्य संघटनेने सुचविले आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर या इंजेक्शनचा उपयोग चांगला होऊ शकेल, त्यामुळे राज्य शासनाने १० हजार इंजेक्शन व्हायल्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) या इंजेक्शनची खरेदी केली जाणार आहे.
आतापर्यंत काही रुग्णांकडून हे इंजेक्शन वैयक्तिकरित्या खरेदी करून त्याचा वापर झाला आहे. मात्र सर्वसामान्य रुग्णांना ते घेणे परवडणारे नसल्याने शासनाने त्यांच्यासाठी हे इंजेक्शन खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. हे इंजेक्शन उपलब्ध झाल्यावर त्याच्या वापराबाबत प्रमाणित पद्धत (एसओपी) तयार केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.