नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाने विलग वाहतुकीसाठी एक देशी हवाई–बचाव पॉडचे (अर्पित) डिझाइन तयार करून ते विकासित केले, तसेच त्याची निर्मितीही केली आहे. डोंगराळ भागातील, वेगेवगळ्या ठिकाणी तसेच दुर्गम भागातील कोविड–19 मुळे बाधित अत्यवस्थ रुग्णांचे स्थलांतर करण्यासाठी याचा उपयोग केला जाणार आहे.
कोविड–19 ची साथीचा आजार म्हणून घोषणा झाल्यानंतर हवाई मार्गाने प्रवासादरम्यान कोविड–19 च्या रुग्णांमुळे संसर्ग पसरण्याचा धोका टाळण्यासाठी वेगळ्या प्रकारच्या स्थलांतर व्यवस्थेची गरज निर्माण झाली. सर्वप्रथम प्रोटोटाइप विकसित करण्यात आले, ज्यामध्ये नंतर अनेक बदल करण्यात आले. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत आवाहनाचे समर्थन करताना हे ‘एअरबॉर्न रेस्क्य़ू पॉड’ तयार करताना केवळ स्वदेशी साधनांचा वापर करण्यात आला आहे. हे विकसित करण्यासाठी केवळ 60 हजार रुपये खर्च आला आहे, आयात सामग्री वापरल्यास तुलनेने याचा खर्च अधिक होऊन साठ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो; हे पाहता सध्या तयार करण्यात आलेल्या सामग्रीचा खर्च खूप कमी आहे.
उड्डाणासाठी वापरण्यात येणारी हलक्या वजनाची साहित्ये ही यंत्रणा विकसित करण्यासाठी वापरण्यात आली आहे. यामध्ये रुग्ण दिसावेत, यासाठी एक पारदर्शी आणि टिकाऊ उच्च गुणवत्ता असलेले प्लॅस्टिक शीट वापारण्यात आले आहे, जे उपलब्ध मॉडेलच्या तुलनेत अधिक उत्तम दर्जाचे आहे. ही यंत्रणा रुग्णांवर देखरेख ठेवण्याबरोबरच त्यांना वायुविजनाची सुविधा देखील उपलब्ध करून देते. याशिवाय ही यंत्रणा हवाई प्रवासा दरम्यानचे कर्मचारी आणि जमिनीवरील कर्मचारी सदस्यांमध्ये संसर्ग रोखण्यासही सक्षम आहे.
यामध्ये जीवरक्षक उपकरण (मल्टीपॅरा मॉनिटर, पल्स ऑक्सीमीटर, इन्फूजन पम्प इत्यादी) देखील आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी लांब हाताचे मोजे देण्यात आले आहेत. या पॉडमध्ये आवश्यकतेनुसार डिझाइन तयार करण्यात आले आहे, तसेच आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (एमओएचएफडब्ल्यू), रुग्णालये व आरोग्य सेवा प्रदात्यांसाठी राष्ट्रीय मान्यता असलेले मंडळ (एनएबीएच) आणि अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्र (सीडीसी) यांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर आधारित हे डिझाइन तयार करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाकडे आतापर्यंत अशी 7 ‘ अर्पित ‘ ताफ्यात आली आहेत.