यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या आयआयएमएस तर्फे आयोजित ‘सॉफ्ट स्किलचे महत्व’ या विषयावरील वेबिनार संपन्न

पुणे : रोजगारसंधी प्राप्त करण्यासाठी संवाद कौशल्याचा प्रभावी वापर उपयुक्त ठरतो असे मत एक्च्युएशन टेक्नॉलॉजीस इर्मसन ऑटोसोल कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापिका हेमांगी धोकटे यांनी  व्यक्त केले. यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल  इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्स (आयआयएमएस) तर्फे आयोजित सॉफ्ट स्किल्सचे महत्व या विषयावरील वेबिनारमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, इंटरव्ह्यूला जाताना आपली वेशभूषा नीटनेटकी व व्यक्तिमत्वास अनुरूप असावी. तसेच आपली आवड,  छंद या बाबी आपल्या करिअरला पोषक कशा ठरतील याकडेही प्रत्येकाने लक्ष  द्यावे, असे सांगत त्यांनी आपले  विद्यार्थीदशेतील अनुभव सांगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी वेबिनारमध्ये बोलताना टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपचे मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापक टिकम शेखावत यांनी सॉफ्ट स्किल्सचा प्रभावी वापर याबाबत मनोगत व्यक्त केले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि, नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाण्याअगोदर संबंधित कंपनीबाबत व ज्या पदासाठी आपण नोकरीचा अर्ज करत असाल त्या पदाचे कामकाजाचे स्वरूप, जबाबदारी याबाबत पुरेशी माहिती करून घेणे फायद्याचे ठरते. तसेच इंटरव्हयु देताना तुम्हाला विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे व्यक्तिगत पातळीवर न देता तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या संबंधित पदावरील व्यक्ती कशा पद्धतीने त्या प्रश्नांना उत्तरे देईल या मनोभूमिकेतून उत्तरे द्यायला हवीत असेही त्यांनी सांगितले. तसेच प्रत्येकाने स्वतःच्या करिअरला सहाय्यकारी ठरेल अशा पद्धतीने स्वतःच्या व्यक्तिमत्वाची घडण करावी असेही नमूद केले.

याशिवाय वेबिनारच्या तिसऱ्या वक्त्या यशस्वी ग्रुपच्या मनुष्यबळ व्यवस्थापिका मनिषा खोमणे यांनी  आपल्या मनोगतात रेझ्युमे व सादरीकरणाची कौशल्ये परिणामकारक कशी ठरू शकतात याबद्दल मार्गदर्शन केले, यावेळी बोलताना त्या म्हणाल्या कि, समोर येईल त्याआव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवून कामात बदल करायची वेळ आल्यास तो सहजगत्या स्वीकारण्याची लवचिक मानसिकता जोपासणे गरजेचे आहे. विशेषतः आर्थिक संकट काळात टिकून राहिल्याने ज्या ज्या  नवनवीन गोष्टी, बदल हे स्वीकारावे लागतात ते अंगिकारल्यामुळे पुढे जाऊन आपल्या उज्वल भविष्यासाठी असे अनुभव शिदोरी ठरतात.

या वेबिनारमध्ये विविध व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयांचे विद्यार्थी, प्राध्यापक सहभागी झाले होते, या वेबिनारसाठी समन्वयक म्हणून प्रा.अमर गुप्ता यांनी काम पाहिले तर आभार प्रदर्शन डॉ. वंदना मोहांती यांनी केले.