गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी घेतला कायदा-सुव्यवस्थेचा आढावा
मुंबई : यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडळांना केले आहे.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेचा मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित बैठकीत आढावा घेतला. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभूराज देसाई, मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी पेडणेकर, खासदार, आमदारांसह मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.
पुणे तसेच इतर बऱ्याच ठिकाणच्या गणेश मंडळांनी यावर्षी कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हा उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्याबाबत निर्णय घेतलेला आहे, याबद्दल तसेच शासन जो निर्णय घेईल त्यास पूर्णपणे पाठिंबा आहे, अशी ग्वाही राज्यातील गणेश मंडळांनी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले. शिर्डी सिद्धिविनायक व या सारख्या संस्थांनी त्याचप्रमाणे गणेश मंडळांनी देखील मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत केली तसेच सामाजिक उपक्रम राबवले त्याबद्दलही मुख्यमंत्र्यांची सर्वांचे आभार मानले.
बैठकीत मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनाचा धोका संपलेला नाही, गर्दी करता येणार नाही, मिरवणूका काढता येणार नाहीत. कोरोना पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता, योग्य निर्णय घेऊनच अतिशय साधेपणाने हा उत्सव साजरा करावा लागेल. ही साधेपणाची चौकट आपणा सर्वांना ठरवावी लागेल. आपण महाराष्ट्रात पुनश्च हरिओम करीत आहोत. प्रत्येक पाऊल हे सावधतेने टाकत आहोत. त्यामुळे हा उत्सव साजरा करताना देखील आपल्याला चौकटीत राहून उत्सव साजरा करावा लागेल. कोणत्याही परिस्थितीत परंपरा खंडित होणार नाही याची काळजी आपण घेऊ. पण उत्सव साजरा करताना सामाजिक भान ठेवावेच लागेल. संपूर्ण जगाला हेवा वाटेल असा गणेशोत्सव आपण साजरा करू. यासाठीचा कार्यक्रम निश्चित करून आपण हा सण साजरा करू असेही मुख्यमंत्री म्हणाले. गणेश मंडळांच्यामार्फत सामाजिक जनजागृती कशी केली जाईल याचा आपण विचार करू व हा उत्सव साजरा करू. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
आरोग्याची काळजी घ्यावी -उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले, पुण्यातील गणेश मंडळांनी गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. त्याचे सर्वांनी अनुकरण करावे. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या वारीने देखील शासनाने केलेल्या आवाहनास प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले.
कोरोनाची समस्या जागतिक असून पुढील काळ कदाचित अधिक आव्हानात्मक असेल. त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी आणि तसे नियोजन करावे. पुढील काळात आषाढी, दहिहंडी, स्वातंत्र्य दिन असे महत्त्वाचे सण-उत्सव आहेत. हे सण उत्सव साजरे करताना उत्साह कायम ठेवावा व घरातच थांबून ते साजरे करावेत. यासाठी जनजागृती आवश्यक आहे. पाऊस आणि कोरोना या दोन आव्हानांविरुद्ध लढाई आहे. सर्वांनीच आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले.
गणेशोत्सवासाठी पोलीस दल सज्ज: गृहमंत्री अनिल देशमुख
कोरोनाविरुद्धची लढाई गेल्या तीन महिन्यापासून सुरू आहे. आपले पोलीस थोडे थकले आहेत पण त्यांची हिंमत कायम आहे. परप्रांतीय कामगारांची वापसी, पावसाळा, कोरोना संक्रमण अशा अडचणी आहेत. पण शासन गणेशोत्सव साजरा करण्याबाबत ज्या काही सूचना देतील, त्याप्रमाणे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दल सज्ज असल्याची निःसंदिग्ध ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी दिली.
मान्यवरांनी केल्या उपयुक्त सूचना
मुख्य सचिव अजोय मेहता यांनी कोरोना नियंत्रित आहे पण धोका टळला नाही असे सांगून उत्सवाच्या वेळी एकत्रित येणे हे कोरोना परिस्थितीमध्ये घातक ठरेल. त्यामुळे अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन केले. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या तयारीबाबतची सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे कायदा व सुव्यवस्था या संदर्भात राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल व मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पोलीस दलाच्या तयारीची माहिती बैठकीत दिली. या बैठकीत बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष अँड. नरेश दहिबावकर, सर्वश्री जयेंद्र साळगावकर, माजी आमदार विनोद घोसाळकर, दगडूशेठ हलवाई गणेश मंडळातर्फे अण्णासाहेब थोरात, बृहन्मुंबई गणेश मुर्तीकार संघाचे अध्यक्ष यांनीही अत्यंत महत्वाचा व उपयुक्त सूचना मांडल्या.
गृह विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमार यांनी बैठकीच्या सुरुवातीला प्रस्तावना केली. कोरोना पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून राज्यातील विविध मंडळांचे पदाधिकारी यात सामील झाले असल्याची माहिती दिली. तसेच बैठकीचे संचलन ही त्यांनी केले. प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी शेवटी सर्वांचे आभार व्यक्त केले. या बैठकीस राज्यभरातील गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.