पुणे : शासनाच्या दिनांक 24 मे 2020 च्या मार्गदर्शक तत्वांनुसार परदेशातून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांसाठी संस्थात्मक क्वारंटाइन होणे बंधनकारक आहे. असे असून सुद्धा अश्विन कुमार (वय वर्षे 31) हे दिनांक 16 जून रोजी विमानाने युकेहून मुंबईला आले व नंतर हंडेवाडी (तालुका हवेली, जिल्हा पुणे) येथील त्यांच्या घरी परस्पर निघून गेले. त्या वेळी कार्यरत असलेल्या पुणे महापालिकेचे नोडल अधिकारी अजित सणस यांनी घरी जाऊन त्याला समजावून सांगितले.
तथापि, त्याने इन्स्टिट्यूशनमध्ये क्वारंटाइन होण्यास नकार दिला. त्यामुळे जिल्हा परिषदेचे गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्या आदेशावरुन संबंधितांविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल करून भारतीय दंड संहिता 1860 कलम 188, 270 आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51, महाराष्ट्र कोविड 19 विनियमन 2020 कलम 11 व साथीचे रोग अधिनियम 1897 कलम 2 प्रमाणे प्रगती उल्हास कोरडे यांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशन (पुणे ग्रामीण) येथे गुन्हा दाखल केला असल्याचे उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर यांनी कळवले आहे.