मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात टाळेबंदी लागू झाल्यापासून आतापर्यंत पोलिसांनी अत्यावश्यक सेवेसाठी एकूण ४ लाख ९९ हजार २८० परवाने दिले, तसंच ६ लाख १९ हजार व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
२२ मार्च ते २० जून या कालावधीत १ लाख ३३ हजार ३११ गुन्ह्यांची नोंद झाली असून २७ हजार २६६ व्यक्तींना अटक करण्यात आली, तर विविध गुन्ह्यांसाठी एकूण ८ कोटी ३२ लाख २३ हजार ७११ रुपयांचा दंड आकारण्यात आला असं त्यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
या दरम्यान पोलिसांवर हल्ल्याच्या २७५ घटना घडल्या. या प्रकरणी ८५४ व्यक्तींना ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे असं त्यांनी सांगितलं.
कोरोनामुळे आतापर्यंत राज्यातल्या ४७ पोलिसांचा मृत्यू झाला असून कोरोनाची लक्षणं असलेल्या पोलिसांना तातडीनं उपचार मिळावेत, यासाठी राज्यभरात एकूण १०९ नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून सध्या ११८ पोलीस अधिकारी आणि ८८३ पोलीस याठिकाणी उपचार घेत आहेत, अशी माहिती या पत्रकात दिली आहे. कोरोना विरुद्धच्या लढाईत प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित असून, सुरक्षित शारीरिक अंतर राखण्याचा नियम पाळून त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन गृहमंत्र्यांनी केलं आहे.