मुंबई :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त राज्यातील युवा पिढीला व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले असून निरोगी, तंदुरुस्त जीवन जगण्यासाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात की, अमली पदार्थांचे सेवन हा मानसिक आजार आहे. त्याचे दुष्परिणाम सेवन करणाऱ्या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबावर, समाजावर होत असतात. असं असलं तरी कुठल्याही व्यसनांपासून मुक्त होता येतं. त्यासाठी वेळीच तज्ञांची मदत घ्या. त्यांनी सुचवलेले उपचार करा.

आपली तरुण पिढी हीच देशाची संपत्ती, भविष्य आहे. हे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी युवा पिढी व्यसनमुक्त, अमली पदार्थांपासून दूर राहिली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकानं योगदान देण्याची गरज आहे. मानवी आयुष्य सुंदर आहे. ते सुंदर ठेवण्यासाठी अमली पदार्थांपासून, व्यसनांपासून दूर सर्वांनी राहा. आपापल्या आरोग्याची काळजी घ्या. दररोज व्यायाम करा. निरोगी राहा, तंदुरुस्त राहा, तंदुरुस्त दिसा… असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.