नवी दिल्ली : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांचं राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार, पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. ते एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे या दोनही पक्षांचा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही तीनही पक्षांनी मिळून पुढची विधानसभा निवडणूक एकत्र लढवली तर आजचंच चित्र राज्यात पुन्हा दिसेल असं पवार यांनी म्हटल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
राज्यात कोरोनाच्या संसर्गामुळे उद्भवलेली परिस्थिती, महाविकास आघाडीचं सरकार चांगल्यारितीनं हाताळत आहे. सरकारमधल्या तीनही घटकपक्षांमधे कोणतेही मतभेद नाहीत, जे निर्णय घेतले जात आहेत, त्या परस्पर सहमती आहे, असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग असलेल्या मुंबई, ठाणे आणि पुण्यात सरसकट व्यवहार सुरु करू नयेत, मात्र राज्यात इतरत्र सर्व व्यवहार हळूहळू सुरु करावेत असं आपल्याला वाटतं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही त्याचप्रमाणे निर्णय घेतले आहेत. मुंबईत धारावी आणि झोपडपट्ट्या असलेल्या काही परिसरांमधली परिस्थिती आव्हानात्मक होती. मात्र आता तिथल्या स्थितीत मोठी सुधारणा झाली आहे, राज्यतली परिस्थितीही हळूहळू बदलू लागली आहे असंही पवार म्हणाले.