‘मिलकर’च्या माध्यमातून दान आणि काम करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईकरांना आवाहन

क्राउड फंडिंगसाठीच्या http://www.milkar.org संकेतस्थळाचे उद्घाटन

मुंबई : मला तुम्ही विचाराल की देव कुठे आहे तर मी म्हणेन देव मदत करणाऱ्या सर्व हातांमध्ये आहे. सगळे मिळून जेव्हा काम करतात तेव्हा यश हे मिळतेच. त्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याने आणि मदतीने आपण कोविड विषाणूविरुद्धचे हे युद्ध जिंकूच असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते क्राऊड फंडिंग प्रणालीच्या https://milkar.ketto.org/covid19 या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते.

मिलकर संकेतस्थळाच्या माध्यमातून गरजवंतांपर्यंत अन्न पोहोचवण्यासाठी एकत्र आलेल्या स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट हाऊसेसचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. मुंबईकरांनी पुढे येऊन ‘मिलकर’ व्यासपीठाच्या माध्यमातून काम आणि दान करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.

बृहन्मुंबई महानगरपालिका, कॉर्पोरेट हाऊसेस आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्रित येऊन हे व्यासपीठ विकसित केले असून ते भुकेल्या व्यक्तींना अन्न पुरवण्यासाठी एक माध्यम (सेतू) म्हणून काम करील. गोदरेज अँण्ड बॉयसी, आरपीजी फाऊंडेशन, एटीई चंद्रा फाऊंडेशन हे या निधीत भरीव भर घालणार आहेत. एखाद्याने योगदान दिल्यास, त्याच्यामध्ये पाच पट भर घालून हा निधी संबंधित वॉर्डमधील लोकांच्या जेवणाची सोय करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

उद्घाटनाच्या या कार्यक्रमात पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह विविध कॉर्पोरेट हाऊसेसचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यात आरपीजी फाऊंडेशनच्या राधा गोयंका, अक्षय गुप्ता, केटूचे कुणाल कपूर, अनंत गोयंका यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सहभागी झाले होते.

मुख्यमंत्री म्हणाले, जगातील सर्वात मोठे केंद्र म्हणून प्लाटिना प्लाझमा सेंटरची सुरुवात महाराष्ट्रात करण्यात आली असून प्लाझमा बँक म्हणून हे केंद्र काम करील. कोविड विषाणूविरुद्ध लढताना हे महत्त्वाचे पाऊल राज्य शासनाने टाकले आहे. मार्च महिन्यापासून राज्यात कोविडचा प्रादुर्भाव सुरु झाला त्या दिवसापासून आतापर्यंत राज्य शासनाने अनेक उपाययोजना केल्या. फक्त राज्य शासनाने हे काम केले का? तर नाही. हे काम कुण्या एकट्याचे नाही. शासनासोबत अनेकांचे मदतीचे हात पुढे आले, त्या सर्व मदतीच्या हातांचा मला अभिमान वाटतो. कोरोना विषाणूविरुद्ध लढताना खूप लोक, स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट हाऊसेस सहभागी होऊन काम करत आहेत. मिलकर हे त्यातीलच एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. मदत करणाऱ्या सर्व लोकांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. त्यांना पुढे जाताना काही अडचण आली तर शासन तुमच्यासमेवत आहे असा शब्दही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला.

मिशन बिगीन अगेनद्वारे पुढे जात असताना कोरोना रुग्णाचे प्रमाण वाढते आहे. काही ठिकाणी लॉकडाऊन चालू पुन्हा बंद असे होते आहे. हे होत राहणार, पण मनातील भीती काढा आणि मदतीला पुढे या. जोपर्यंत कोरोना प्रादुर्भाव थांबत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम सुरु ठेवायचे आहे. आता पावसाळा सुरु झाला आहे. पावसाळ्यात काही अडचणी येऊ शकतात, अशा परिस्थितीत शासनाला तुम्हा सर्वांच्या मदतीची गरज आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी मिलकर व्यासपीठाच्या माध्यमातून गरजू लोकांपर्यंत रेशनकिट पोहोचवणे शक्य होणार असून यामुळे मुंबईत कुणीही भुकेले राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला. हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे सांगताना त्यांनी ‘मिलकर’च्या टीमचे अभिनंदन करून पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या

मिलकर काय आहे?

कोविड विषाणूने आपल्या जीवनात अनेक महत्त्वपूर्ण पाठ शिकवले आहेत त्यापैकीच एक म्हणजे सामूहिक कृतीची शक्ती. मिलकर हा ज्यांच्याकडे सगळं आहे त्यांना गरजू लोकांशी जोडणारा सेतू आहे. हे सगळे लोक, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि स्वयंसेवी संस्थां, कॉर्पोरेट हाऊसेस यांनी एकत्र येऊन भूक निर्मूलनासाठी सुरु केलेल्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे मिलकर. यामध्ये जेवढी रक्कम दान होईल त्यात पाचपट रक्कम कॉर्पोरेट हाउसेस कडून टाकण्यात येणार आहे. मिलकर व्यासपीठाची हीच शक्ती आहे. यात प्रथम, युवा, चाईल्ड राईट्स ॲण्ड यु, चाईल्ड हूड टू लाईव्हहूड, अक्षयपात्र, फ्रॉम यु टू देम, सलाम मुंबई, क्राय यासारख्या स्वंयसेवी संस्थाही सहभागी झाल्या आहेत.

मिलकरच्या माध्यमातून जे लोक मदत करू इच्छितात त्यांना ज्या वॉर्डमध्ये मदत करायची आहे तो वॉर्ड निवडण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यांना या प्रभागात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून गरजू व्यक्तीपर्यंत रेशनकिट पोहोचवता येईल. यात एक व्यक्ती,दोन व्यक्ती पाच व्यक्तीचे एक कुटुंब, पाच व्यक्तींचे दोन कुटुंब, पाच व्यक्तींचे चार कुटुंब अशा पद्धतीने मदत देऊन त्यांना रेशन पुरवता येईल, त्यांच्या जेवणाचा खर्च उचलता येईल.