नवी दिल्ली : येत्या बुधवारच्या आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, राज्यातल्या मानाच्या नऊ पालख्या आणि दहा प्रमुख संस्थानांच्या पादुका श्री क्षेत्र पंढरपूर इथं उद्या रात्री अकरा वाजेपर्यंत पोहोचणार आहेत. यामध्ये पैठणचं संत एकनाथ महाराज संस्थान, संत निवृत्तीनाथ महाराज-त्र्यंबकेश्वर, सासवडचं सोपानदेव महाराज संस्थान, संत मुक्ताबाई -मुक्ताईनगर, विठ्ठल-रुक्माई संस्थान -कौंडिण्यपूर, अमरावती तसंच संत तुकाराम महाराज-देहू, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान-आळंदी, संत नामदेव महाराज-सोलापूर, संत निळोबाराय संस्थान-पिंपळनेर इथल्या पादुकांचा यात समावेश आहे. कोविड 19 च्या साथीमुळे प्रमुख संस्थानच्या पादुकांना पंढरपूरला जाण्याची सशर्त परवानगी मिळाली आहे. पादुकांसोबत २० जणांना जाण्याची मुभा आहे.
दरम्यान, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उद्यापासून पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि त्याच्या दहा किलोमीटर परिसरात 30 जून पासून दोन जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लागू राहील. सर्वसामान्य नागरिकांनी आणि वारक-यांनी या कालावधीत पंढरपुरात येऊ नये, असं आवाहन प्रशासनानं आज पत्रकार परिषदेत केलं.
प्रथेप्रमाणे विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. त्याकरता मुख्यमंत्र्यांचं कुटुंब, जिल्हा पालकमंत्र्यांचं कुटुंबं, मंदिर समिती आणि सल्लागार समिती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नसेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्निक पूजा करतील आणि जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे त्यावेळी उपस्थित असतील. ज्यांना पंढरपुरातून दुस-या गावात जायचं आहे, त्यांनी इतर मार्गांचा वापर करावा, असंही आवाहन पोलिसांनी केलं आहे.