नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्याच्या विविध भागात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. परभणी शहर तसंच जिल्ह्याच्या काही भागात काल पावसानं हजेरी लावली. पूर्णा, मानवत तालुक्यात चांगला पाऊस झाला. गंगाखेड शहरासह परिसरातल्या काही भागात काल दुपारी पाऊस झाला. पूर्णा-नांदेड रस्त्यावरच्या गौर नजीक पुलाचं काम सुरु असून पर्यायी रस्त्यावरही पावसाचं पाणी साचल्यानं दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठ-दहा दिवसांपासून दडी मारलेल्या पावसानं आज पुन्हा हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी मेघ गर्जनेसह आज पाऊस झाला.

लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात आज दुपारी ढगफुटी झाल्यानं पाचशे हेक्टरावरचं सोयाबीन वाहून गेलं. शेतातली माती वाहून गेल्यानं झाडं पडली.  शेतांमध्ये तीन ते चार फूट पाणी साचलं असून साठवणीतली खतं आणि इतर साहित्याचं नुकसान झालं आहे.

धुळे जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या पावसामुळे पेरण्यांना वेग आला आहे. काल मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. आत्तापर्यंत सर्वाधिक लागवड कपाशीची झाली. ज्वारी, सोयाबीन, बाजरी, मका, भुईमूग इत्यादी पेरण्या झाल्या आहेत.

हिंगोली जिल्ह्यात काल सलग तिसऱ्या दिवशी चांगला पाऊस झाला. सेनगाव तालुक्यात ४१ मिलीमीटर पाऊस झाला असून दोन मंडळांत अतिवृष्टी झाली. यामध्ये गोरेगाव-सेनगाव रस्त्यावर आजेगावनजिकचा पर्यायी पूल वाहून गेल्यानं ३० ते ४० गावांचा संपर्क तुटला. तालुक्यातल्या अनेक ठिकाणी शेतजमिनी खरडून गेल्या असून, शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.