नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ या आजारावर देशात आतापर्यंत ३ लाख ८२२ जणांनी यशस्वीपणे मात केली असून देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ५९ पूर्णांक ६ शतांश टक्के झालं आहे. गेल्या २४ तासात १३ हजार ९९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे.
कोविडचे १८ हजार ५२२ नवे रुग्ण काल आढळले तर ४१८ रुग्णांचा मृत्यू झाला. संक्रमित रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ६६ हजार ८४० झाली आहे. त्यातल्या २ लाख १५ हजार १२५ रुग्णांवर उपचार चालू आहेत. बरे झालेले रुग्ण त्यापेक्षा १ लाख १९ हजार ६९७ ने जास्त आहेत.
कोविड-१९ च्या निदानासाठी सुविधा सातत्याने वाढवण्यात येत आहेत. गेल्या २४ तासात २ लाख १० हजार २९२ नमुने तपासले असून आतापर्यंत ८६ लाख ८ हजार ६५४ चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.
भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनं सांगितलं की ७६१ सरकारी आणि २८८ खासगी मिळून एकूण १ हजार ४९ प्रयोगशाळांमधे चाचण्या होत आहेत.
गुजरात राज्यात गेल्या २४ तासात ६२६ नवीन कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत याबरोबरच गुजरात राज्याचा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ३२ हजार २३ वर पोचला आहे. गेल्या चोवीस तासात १९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोना मुळे एक हजार ८२८ रुग्ण दगावले आहेत.
मुंबईत काल एक हजार २४७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ९२ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णसंख्या काही भागात कमी होत असताना अंधेरी पूर्व विभागात मात्र कोरोनाचे रुग्ण वाढताना दिसत आहेत. या परिसरात पाच हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. तर मुंबईतील पाच वॉर्डात चार हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्ण असल्याचे समोर आले आहे. दहिसर, मालाड, बोरीवली, कांदिवलीतील काही परिसरात कडक लॉकडाऊन करण्यात आले. मुंबईतील चार वॉर्ड कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले असून अंधेरीत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा ५,१७२ वर पोहोचला आहे. तर दादर, माहीम व धारावीत कोरोनाची रुग्ण संख्या ४,८११ वर पोहोचली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाबाधितांच्या संख्येत १९ ची भर पडली असून एकूण संख्या ५९९ झाली आहे. आज सापडलेल्या रुग्णांपैकी दापोली तालुक्यातल्या आडे या एकाच गावातले १० जण आहेत. आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या ४३७ असून पंचवीस जणांचा मृत्यू झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येनं २०० चा टप्पा ओलांडला असून यावर अंकुश ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने २ जुलैपासून लॉकडाऊन जाहीर केलं आहे. हे लॉकडाऊन ८ जुलैपर्यंत असेल. दरम्यान आज कोरोनाचा पाचवा बळी गेला आहे. जिल्ह्यात काल रात्री एक रुग्ण पॉझिटिव्ह सापडला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधितांची संख्या २१४ वर पोहोचली आहे. आतापर्यंत १५१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
रायगड जिल्ह्यात काल सर्वाधिक म्हणजे २३४ कोरोना बाधित रूग्ण वाढले असून जिल्ह्यातील एकूण रूग्णाची संख्या आता ३ हजार ६८३ झाली आहे. आतापर्यंत १३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्य़ात २ हजार १९५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
८० वर्षांचे वृध्द आणि २ वर्षांच्या चिमुकलीसह अहमदनगर जिल्ह्यात आज १६ रुग्णां कोरोनावर मात केली आहे जिल्ह्यात एकूण बरे झालेले रुग्ण संख्या आता ३०७ झाली असून उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या ही १०१ इतकी झाली आहे. दरम्यान, आज सकाळी ५५ व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून हे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आझेत.
नाशिक जिल्ह्यात काल कोरोनाने तब्बल नऊ बाधितांचा बळी घेतल्याने एकूण बळींची संख्या थेट २३४ वर पोहोचली आहे, तर जिल्ह्यात बाधितांच्या संख्येत दिवसभरात १८२ रुग्णांची भर पडल्याने एकूण बाधित संख्या चार हजारांचा टप्पा ओलांडून ४०४३ वर पोहोचली आहे. दरम्यान आतापर्यंत जिल्ह्यातील २ हजार १९४ कोरोना बाधित रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या १ हजार ६१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तर आत्तापर्यंत २३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यात काल नवीन 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. सध्या उपचाराखाली १३० रुग्ण असून २२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात आज 12 पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले असून आता बाधितांची एकूण संख्या 561 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 396 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी गेले आहेत आतापर्यंत कोरोनाने 23 जणांचा मृत्यू झाला आहे .सध्या 142 रुग्ण उपचार घेत आहेत.
भंडारा जिल्ह्यात काल एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे. आतापर्यंत 58 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 80 झाली असून 22 क्रियाशील रुग्ण आहेत.
परभणी काल चार रुग्ण कोरोनाबाधित आल्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 113 झाली आहे. जिल्ह्यामध्ये ९१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 4 रुग्णांचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे.
परभणी तालुक्यातील झरी ग्रामपंचायत हद्दीत उद्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.