‘कोरोना’ संकटाविरुद्धच्या लढ्याबद्दल डॉक्टरांचा ऋणी;डॉक्टर बांधवांचं स्थान लोकांच्या हृदयात कायम राहील उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : ‘रुग्णसेवे’च्या माध्यमातून मानवतेची सेवा करणारे डॉक्टर समाजासाठी नेहमीच आदरणीय आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत पहिल्या फळीतील योद्धे म्हणून ते लढत असताना त्यांच्याबद्दलचा आदर अधिक वाढला आहे. कोरोना संकटात डॉक्टर बांधवांकडून होत असलेली मानवसेवा इतिहासात सुवर्णाक्षरात लिहिली जाईल, त्यांचं स्थान आपल्या हृदयात कायम राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉक्टर बांधवांबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार संदेशात म्हणतात की, ‘कोरोना’च्या संकटाविरुद्ध जगभरातील डॉक्टर जोखीम पत्करुन एकजुटीने लढत आहेत. जगभरातील डॉक्टरांची एकजूट, ज्ञानाच्या, अनुभवाच्या आदानप्रदानाने हा लढा आपण नक्की जिंकू. जगभरातील डॉक्टर आज कोरोनाच्या संकटाविरुद्ध ज्या जिद्दीनं, ज्या भावनेनं लढत आहेत त्याला सलाम आहे. डॉक्टरांच्या सेवाकार्याबद्दल आपण सदैव त्यांचे ऋणी आहोत. कृतज्ञ आहोत. आपणा सर्वांना डॉक्टर दिनाच्या मनापासून शुभेच्छा…