पुणे : कोरोना संशयित व्यक्तींचे चाचणीसाठी घेतलेल्या नमुनांचा अहवाल 24 तासांच्या आत करण्याचे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. हे अहवाल रुग्ण ज्या भागातील रहिवासी आहे म्हणजेच पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, ग्रामीण भागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी दिल्या.
विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसैकर यांच्या अध्यक्षतेखाली कोवीड -19 संसर्गजन्य आजाराच्या अनुषंगाने खासगी प्रयोगशाळा चालकांसोबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी सूचना दिल्या.
सर्व प्रयोगशाळा चालकांनी दररोज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत दिलेल्या नमुन्यातील अहवाल न चुकता श्री. कुलकर्णी, आरोग्य उपसंचालक कार्यालय यांच्याकडे सादर करावे. चाचणी बाबत आरटी-पीसीआरवर डेटा दररोज अपलोड करण्यात यावा व दैनंदिन अहवाल सनियंत्रण अधिकारी यांना देण्यासाठी प्रत्येक प्रयोगशाळेने एका नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. नोडल अधिकाऱ्यांच्या दूरध्वनी क्रमांक कळविण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसैकर दिल्या.