नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड १९च्या प्रादुर्भावाच्या काळात येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करण्याबाबतचे विशेष दिशानिर्देश केंद्र सरकारनं जाहीर केले आहेत. याबाबतचं पत्र गृहमंत्रालयानं राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलं आहे.

स्वातंत्र्य दिन समारंभात गर्दी जमा न करणं, सुरक्षित अंतराचं पालन करणं अनिवार्य असल्याचे निर्देश या पत्रात राज्य, जिल्हा तसंच पंचायत अधिकाऱ्यांना दिले आहेत.

गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार दिल्लीतल्या लाल किल्ल्यावर साजरा होणारा स्वातंत्र्य दिनाचा मुख्य सोहळा यावर्षी साधेपणानं साजरा केला जाणार आहे. फक्त प्रधानमंत्र्यांचं राष्ट्राला संबोधन, मानवंदना, ध्वजारोहण, राष्ट्रगीत याच कार्यक्रमांचा या समारोहात समावेश असेल.

डॉक्टर्स, आरोग्य कर्मचारी, स्वच्छता कामगार यांसारखे कोविड योद्धे त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ या समारंभात निमंत्रित असतील. देशाला स्वावलंबी बनवणारे विविध उपक्रम तसंच आत्मनिर्भर भारत योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन सरकारनं केलं आहे.