मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणीच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यासंदर्भातील मंत्रीमंडळ उपसमिती सदस्य तसेच मराठा आरक्षण लढ्यातील विविध मान्यवरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद साधला. न्यायालयीन कामकाजासंदर्भात चर्चा करून सुनावणीसाठी योग्य त्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिल्या.

यावेळी उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, समितीचे सदस्य तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार संभाजी राजे छत्रपती, आमदार भाई जगताप, विनायक मेटे, विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह न्यायालयात शासनाची बाजू मांडणारे विधीज्ञ उपस्थित होते.

मराठा आरक्षणाच्या लढ्याशी संबंधित असलेले विविध मान्यवरही यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे व उपसमिती अध्यक्ष श्री. चव्हाण यांनी त्यांच्याकडून आरक्षण प्रश्नावर त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच सुनावणीसंदर्भातील त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसंदर्भात उपस्थितांशी चर्चा केली तसेच पुढील कामकाजासंदर्भात योग्य त्या सूचना केल्या.